जनतेसमवेत आता पोलीस कर्मचारी असुरक्षित !
मिरज, ९ जून (वार्ता.) – सातारा रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर मद्य पिणार्या तिघांना लोहमार्ग रेल्वे पोलीस कर्मचारी श्रीरंग शिंदे यांनी अटकाव केला असता त्यांच्यावर तिघांनी दगडाने जीवघेणे आक्रमण केले आहे. (गुन्हेगार पोलिसांवर आक्रमण करतात, यातून पोलिसांचा धाक अल्प झाला, असेच म्हणावे लागेल. – संपादक) ६ जूनच्या रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलिसांनी २४ घंट्यांत तिघांना अटक केली. सोमनाथ घाडगे (वय २९ वर्षे), रोहित तुपे (वय २१ वर्षे) आणि अक्षय लोहार (वय २४ वर्षे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत शिंदे गंभीर घायाळ झाले असून त्यांना एका खासगी रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचारासाठी भरती केले आहे.