गेल्या दोन दिवसांत घडलेल्या २ घटना पुढे काय वाढून ठेवले आहे ? याची झलक देणार्या आहेत.
अ. पहिली घटना, म्हणजे तमिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेस यांच्या गुंडांनी एका बकर्याच्या तोंडावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांचा चेहरा चिकटवून त्याची गळा चिरून हत्या केली. (खाली चित्र दिले आहे.) अण्णमलाई ओबीसीत मोडणार्या ज्या जातीचे आहेत त्यांचा पारंपरिक व्यवसाय शेळीपालन हा आहे. या जातीयवादी विचारातून हा प्रकार करण्यात आला. याआधीही रस्त्यावरच वासरू कापून ‘बीफ पार्टी’ (गोमांसाची मेजवानी) करणारे हेच लोक होते.
आ. दुसर्या घटनेत विमानतळावरील एका सुरक्षारक्षक महिलेने भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत यांनी शेतकरी आंदोलनाच्या वेळी जी भूमिका घेतली होती, तिचा निषेध म्हणून त्यांच्या थोबाडीत मारली आणि त्यानंतर कॅमेर्याकडे (ध्वनीचित्रकाकडे) बघून राजकीय शेरेबाजी केली.
या घटनांपेक्षाही अधिक धक्कादायक होते, काँग्रेस आणि ‘लेफ्ट-लिबरल इकोसिस्टिम’ने (साम्यवादी-उदारवादी विरोधकांच्या प्रणाली) त्यांच्या पुरोगामित्व अन् विवेकवादाच्या गप्पा विसरून यांचे केलेले उघड समर्थन अन् महिमामंडन !
१. अराजकाला आमंत्रण
स्त्रियांचा सन्मान आणि सुरक्षा, भाषणस्वातंत्र्य अन् विचारस्वातंत्र्य, ‘मोहब्बत की दुकान’ यांतील काहीच या समर्थनाच्या आड आले नाही. या घटनांमुळे त्यांना होणारा आसुरी आनंद त्यांनी लपवण्याचा प्रयत्नही केला नाही. ‘गणवेशातील सुरक्षा कर्मचार्यांनी स्वतःच्या राजकीय मतांसाठी कायदा हाती घेणे, हे अराजकाला आमंत्रण ठरू शकते. आण्विक ऊर्जा किंवा दारूगोळा कारखाना अशा संवेदनशील ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकांनी स्वतःच्या रागाला अशीच वाट करून द्यायचे ठरवले, तर मोठा अनर्थ ओढवेल’, असा कुठलाही विचार त्यांच्या मनाला शिवलाही नाही.
२. निष्कर्ष आणि करावयाची कृती
यातून निघणारे २ निष्कर्ष असे,
अ. देशात अराजक माजवणे, हेच यांचे उद्दिष्ट आहे. याची प्रचीती याआधीही वेळोवेळी आलेली आहे.
आ. हिंदुत्वनिष्ठ विचारांच्या लोकांविरुद्ध आक्रमक, प्रसंगी हिंसक भूमिका घेण्यावर या लॉबीचे (टोळीचे) संपूर्ण एकमत आहे; कारण या घटनांचा निषेध करणारा एकही आवाज त्या बाजूने आलेला दिसत नाही. अशा कारवाया यापुढे वाढत जाणार आणि त्यांचे एकमताने, एका सुरात समर्थन केले जाणार, हे स्पष्ट दिसत आहे.
अशा वेळी हिंदूंनी आपापसांतील बारीक-सारीक मतभेद बाजूला ठेवून एकी राखणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी बाजू म्हणून कुठलाही विधीनिषेध बाळगत नसतांना हिंदूंनी एखादी गोष्ट पटली नाही, तर गप्प बसावे; पण तत्त्वनिष्ठेच्या कैफात आपल्याच लोकांवर टीका करणे टाळावे. भारतीय संस्कृती, हिंदु धर्म यांच्याविरुद्ध एक झालेल्या ‘डीप स्टेट’ (सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्या गुप्त जाळ्यांचा संदर्भ देते जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकते.), साम्यवादी आणि जिहादी यांच्या शक्तीशाली युतीला तोंड द्यायचे, तर आपापसांतील वैचारिक फाटाफूट टाळायलाच हवी. एकजुटीने, एका आवाजात स्वतःची बाजू मांडणे आणि त्यासाठी राज्यघटनेतील सर्व आयुधांचा प्रभावी वापर करणे यापुढे अपरिहार्य आहे.
– श्री. अभिजित जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘डाव्यांची वाळवी’, या पुस्तकांचे लेखक, पुणे. (७.६.२०२४)