रस्त्यावरील दिव्याचे आत्मवृत्त

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेला निबंध

कु. जयंत आठवले (१४ वर्षे, वर्ष १९५६)

श्रीमन्नारायणाचा अंश असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ते विद्यार्थीदशेत असतांना लिहिलेले निबंध हे ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, या वचनाप्रमाणे त्यांच्यातील देवत्वाची प्रचीती देणारे आहे. त्यांच्या लिखाणातील प्रगल्भता, शब्दांची निवड, विषयाचा अभ्यास, अलंकारीक शब्दप्रयोग आणि कालातीतता या गोष्टी यातून ध्यानात येते.

२०.७.५७

जयंत आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ताक्षरातील निबंध

१. दिव्याचे स्थान

‘सूर्याइतका अचाट प्रकाश जरी आमच्या दीपकुलांत नाही, तरी आमच्या कार्याची महती फार आहे. उपवनातील वृक्षराजींना मुसळधार पावसाचा काही ताटश (फारसा) उपयोग नसतो; परंतु ग्रीष्माच्या कडक उष्णतेने पृथ्वी भाजून निघत असतांना माळ्याने घातलेल्या तांब्याभर पाण्याचे जे स्थान वृक्षाच्या जीवनात आहे, तेच अखिल मानवांच्या जीवनांत आमच्या दीपकुलाचे आहे. माझ्या बांधवापैकी काही जण देवालये आणि गृहे प्रकाशित करीत आहेत; परंतु ‘आमच्या या दीपकुलात रस्त्यावरील दीपस्तंभावर विराजमान झालेला मीच एक ‘कुलदीपक’ आहे’, असे आत्मस्तुती पत्करून, हे मी छातीठोकपणे सांगू शकतो.

२. आगमन आणि आनंदोत्सव

तो दिवस अजून देखील मला माझ्या डोळ्यांपुढे स्पष्टपणे दिसत आहे. एका काळोख्या गल्लीत माझे त्या दिवशी आगमन झाले होते. डोळसांना सुद्धा रात्रीच्या वेळी आंधळ्याप्रमाणे बनविणार्‍या अंधाराचे साम्राज्य माझ्या आगमनाबरोबरच लयास गेले होते. आबालवृद्ध सगळेच माझा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत होते. काहींनी तर माझ्यावर,

‘रात्रीच्या त्या काळोखात, भयाणत्या अंधारात ।
दावी मार्ग योग्य जना तो, उजळी दिशा ।।’

अशी गौरवपर काव्येसुद्धा केली. ‘अशा लोकांच्या सेवेत यापुढे माझे सर्व आयुष्य जाणार’, या कल्पनेनेच मी हुरळून गेलो. मला त्या दिवशी जन्माचे अगदी सार्थक झाल्यासारखे वाटले.

३. सेवा आणि उपयोग

एकाने म्हटले आहे, ‘मानव आयें, मानव जायें, फिरभी कबसे अडा (म्हणजे कर्तव्य करत) खडा है !’

देवालये, रुग्णालये, प्रासाद, वाडे या ठिकाणी लोक माझ्याशिवाय निर्भयतेने लोळत पडलेले असतात; परंतु मी अशा ठिकाणी डोळ्यांत तेल घालून जाणत आहे की, या ठिकाणी क्षणभर अंधःकार झाला असता कितीतरी अनर्थांचा प्रादुर्भाव होईल. मला माझे स्थान सहस्ररश्मी सूर्यनारायणाचा उदय होईपर्यंत सोडता येत नाही. या जगाचे बरे-वाईट सर्व प्रकारचे अनुभव मी घेतले आहेत. माझ्या समोरच्या घरांत रहाणार्‍या एका गरीब कुटुंबास मदत करून मी त्यांचा दिव्यासाठी येणारा खर्च वाचवतो, तसेच कित्येक हुशार आणि होतकरू मुलांना, ज्यांना कोणी आश्रय देत नव्हता, त्यांना आश्रय देऊन मी त्यांच्या ज्ञानसंवर्धनास मदत करीत आहे. त्यांचे दरवर्षीचे परीक्षेतील सुयश पाहून मला केवढा आनंद होतो ! कुत्र्याच्या भीतीने पळणार्‍या मांजरांनासुद्धा आश्रय देऊन मी त्यांच्या धन्यवादाचे स्थान बनलो आहे.

४. अंधत्व

(परंतु) माझा तिरस्कार करणारे, माझ्या सद्गुणांनाच दुर्गुण मानणारे महाभाग काही कमी नाहीत. काळ्या अंधारात काळी कृत्ये करणारे चोर आणि जाट इत्यादी दुराचारी लोकांस मी डोळ्यांसमोरही नको असतो. शेवटी तसे झालेही. गेल्या वर्षी कसलीतरी राजकीय भानगड कळली होती. तेव्हा कोणीतरी एकजण मंबाजी आला आणि त्याने दगड भिरकावून माझा डोळाच फोडला. झाले ! सगळीकडे सैतानशाहीला अगदी ऊत आला.

५. नगरपालिकेने लगेच उपचार करणे

पण माझ्या विधात्याला (नगरपालिकेला) माझी फार काळजी पडली ना ! ‘माझ्या डोळ्याला दुखापत झाली आहे’, असे समजल्यावर विधात्याने एका तज्ञाला तत्काळ पाठविले. माझी तब्येत जरा बरी नसण्याचा अवकाश की, आलीच माणसे सेवेला. मला रोज अंघोळ घालण्यासाठी आणि झोपविण्यासाठी तर स्वतंत्र नोकरच नेमले आहेत. इतके करूनसुद्धा यदाकदाचित चेतन आत्मा माझ्या जड शरिरास सोडून गेला, तरी मी पुनर्जन्म पुन्हा जड शरिरात घेतो.

६. वाईट गोष्टी

पळविली जाणारी मुले, तरुण-तरुणींचे पलायन, दिवसा बाहेरून सज्जन दिसणारे; पण रात्री भलतीकडेच जाणारे लोक पाहून, तर मला या दुनियेचा (जगाचा) अगदी वीट आला आणि ‘डोळे मिटून घ्यावेत’, असे वाटू लागले. चोरांना कित्येक वेळा चोरीचा बेत गुप्तपणे ठरवितांना, म्हणजे त्यांना गुप्तपणा वाटे; पण सर्वज्ञ असा मी पहातच होतो. चोरून आणलेला माल वाटून घेतांना मी पाहिले आहे; परंतु ‘चहाडी कधी करू नये’; म्हणून मी त्यांच्याविरुद्ध एक चकार शब्दही बोलत नाही.

७. लोकांचा कृतघ्नपणा

पूजेमध्ये दीपपूजन हे देवपूजेचे एक अंग मानले जाते; पण तेथे असलेल्या नंदादीप अगर इतर दिव्यांची पूजा केली जाते. मानवांना इतक्या प्रकारे मदत करूनसुद्धा माझी पूजा करणे, तर दूरच; पण ते माझ्याकडे उपहासाने आणि तुच्छतेने बघतात. हे पाहून मला फार वाईट वाटते; परंतु तुम्ही माझ्याशी वाईट रितीने वागलात, तरी मला तुमच्याशी ‘जबतक तनमें प्राण है, तबतक मार्ग हि बतलाऊँगा ।’ असेच चांगल्या रितीने वागण्याची बुद्धी देवाने मला द्यावी’, एवढेच माझे देवाकडे मागणे आहे.