सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची सर्वज्ञता !

सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर

‘पं. सतीश शर्मा हे वास्तू विशारद आणि ज्योतिष जाणणारे आहेत. १६.४.२०२३ या दिवशी झालेल्या त्यांच्या ‘वास्तूशास्त्र – तत्त्व एवं शंकासमाधान’ या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची मला संधी मिळाली. त्या वेळी मी त्यांना कलेच्या अनुषंगाने पुढील प्रश्न विचारला, ‘‘लालित्य कलांमध्ये एखाद्याने भरतनाट्यम् शिकावे कि कथ्थक, हे आपल्याला कसे समजेल ? किंवा त्यासाठी ग्रहांची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे का ?’’ यावर त्यांनी सांगितले, ‘‘त्या व्यक्तीची पत्रिका बघूनच आपल्याला हे समजू शकते. माझ्या माहितीनुसार आतापर्यंत २ किंवा ३ च व्यक्ती अशा आहेत, ज्या हे सांगू शकतील. हा विषय किंवा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.’’ त्यांनी दिलेल्या या उत्तरावरून मला पुढील गोष्टी लक्षात आल्या.

आपल्या आयुष्यामध्ये परात्पर गुरुदेव डॉ. आठवले आले आहेत. ते आम्हा सर्व साधकांना आमच्या प्रकृतीनुसार कोणती साधना केल्यावर अध्यात्मात प्रगती होईल, हे सांगून त्या मार्गाने साधना करावयास मार्गदर्शन करतात. म्हणजे त्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेचा किंवा अन्य कोणताही अभ्यास न करता केवळ त्या साधकाकडे पाहूनच त्याच्या साधनेची स्थिती, त्याची प्रकृती, कोणत्या मार्गाने साधना केली, तर त्याची उन्नती होईल, याविषयी परात्पर गुरुदेव संत, सद्गुरु यांच्या माध्यमातून साधकांना मार्गदर्शन करतात. ते साधकांना कोणत्याही विषयावर साधनेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करू शकतात. यावरून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सर्वज्ञता लक्षात येते. हे सर्व विचार मनात येत असतांना परात्पर गुरुदेवांच्या सर्वज्ञतेची जाणीव होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. ही विचारस्वरूप अनुभूती आठवतांनासुद्धा माझे भावाश्रू थांबत नव्हते.

या जीवनामध्ये आपल्याला परम पूज्य डॉक्टरांसारखे महान गुरु लाभले, यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे !

– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.