‘वास्तुदेवतेला प्रसन्न केल्यामुळे घरात चांगली स्पंदने निर्माण होतात. ती स्पंदने देवतेचे तत्त्व आकर्षित करतात. या लेखात वास्तूमध्ये गोमाता असणे का आवश्यक आहे, हे सांगते.
१. वास्तूमधील नकारात्मकता दूर करण्यासाठी गोपालन करावे !
भारतीय संस्कृतीमध्ये गोमाता आणि तिचे पालन यांना अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. अनेक धर्मग्रंथांमध्येही याचा महिमा सांगितलेला आहे.
१ अ. श्रीमद्भागवद् पुराण : श्रीमद्भागवद् पुराणात म्हटले गेले आहे, ‘सर्वे देवा: स्थिता देहे सर्वदेवमयी हि गौ: ।’
अर्थ : गायीच्या देहात समस्त देवदेवतांचा वास असल्यामुळे ती सर्वदेवमयी आहे.
१ आ. जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ वेद यांच्यासह भविष्य पुराण, स्कंद पुराण, ब्रह्मांड पुराण आणि महाभारत यांमध्येसुद्धा गायीची महती आणि तिच्या अंग-प्रत्यंगामध्ये दिव्य शक्ती असल्याचे वर्णन आढळते.
१ इ. गायीच्या शरिरातील कोणत्या अवयवांत कोणत्या देवता वसल्या आहेत, याविषयी पद्म पुराणात सांगितलेले असणे : पद्म पुराणानुसार, गायीच्या मुखात चारही वेदांचा वास असतो. तिच्या शिंगांमध्ये भगवान शंकर आणि श्रीविष्णु सदैव विराजमान असतात. गायीच्या उदरात कार्तिकेय, मस्तकात ब्रह्मा, कपाळावर रुद्र, शिंगांच्या अग्रभागात इंद्र, दोन्ही कानांमध्ये अश्विनीकुमार, नेत्रांमध्ये सूर्य आणि चंद्र, दातांमध्ये गरुड, जिभेवर सरस्वती, अपानस्थानी (गुदद्वारात) सर्व तीर्थे, मूत्रस्थानात गंगामाता, त्वचेच्या रोमछिद्रात ऋषिगण, पृष्ठभागावर यमराज, दक्षिण (उजवा) पार्श्वभागात वरूण आणि कुबेर, वाम (डावा) पार्श्वभागात महाबली यक्ष, मुखाच्या आत गंधर्व, नासिकेच्या अग्रभागात सर्प आणि पायाच्या खुरांच्या मागील भागात अप्सरा असतात.
१ ई. गायीच्या शेणात लक्ष्मी, गोमूत्रामध्ये भवानी, चरणांच्या अग्रभागात आकाशात विहार करणार्या देवता, गायीच्या हंबरण्याच्या स्वरात प्रजापति आणि स्तनांमध्ये समुद्र असतो.
१ उ. ‘जो मनुष्य प्रातः स्नान करून गोमातेला स्पर्श करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन जातो’, असे मानले जाते.
१ ऊ. गायीच्या तुपाचे एक नाव ‘आयु’ असे आहे. ‘आयुर्वै घृतम् ।’
अर्थ : देशी गायीच्या तुपामुळे व्यक्ती दीर्घायुषी होते.
१ ए. गायीच्या पायाला लागलेली माती कपाळाला टिळा म्हणून लावल्यास तीर्थस्नानाचे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. सनातन धर्मात गायीला ‘दूध देणारा एक पशू’, असे न मानता तिला सदैवच ‘देवतांची प्रतिनिधी’ असे मानले गेले आहे.
देशी गोमूत्राच्या साहाय्याने वास्तूशुद्धी कशी करावी ?
अ. वर्तमानकाळात योग्य साधना आणि धर्माचरण यांच्या अभावामुळे अधिकांश घरे भूतबाधेने प्रभावित असतात; म्हणून घरात नियमित सकाळी आणि सायंकाळी देशी गोमूत्र शिंपडावे; कारण गोमूत्राच्या गंधाने निर्माण होणार्या स्पंदनांतून घरात असलेल्या वाईट शक्ती निघून जातात.
आ. जर ही प्रक्रिया नियमितपणे केली, तर वाईट शक्ती पुन्हा येत नाहीत; परंतु जर त्यांनी घरात स्थान निर्माण केले असेल, तर वाईट शक्ती गोमूत्राच्या गंधाने ४-५ घंट्यांपुरतीच जाते आणि ती पुन्हा परत येते. त्यासाठी सकाळी आणि रात्रीला आरंभ होण्यापूर्वी म्हणजे संध्याकाळी गोमूत्र शिंपडणे अवश्य करावे.
२. सध्याच्या काळात घरांमध्ये नियमितपणे गोमूत्र शिंपडणे अत्यावश्यक असणे
आमचे पूर्वज अशाच सूक्ष्म गोष्टींकडे लक्ष देऊन गोमातेचे पालन करत होते. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात गोवंश असायचे. जरी धनाढ्य लोकांचे घर असले, तरीसुद्धा देवघर, यज्ञस्थळ, अन्नपूर्णा कक्ष, अंगण इत्यादी रंगवणे, सारवणे हे सर्व शेणानेच केले जात असे. त्यामुळे घरात वाईट शक्तींना रहाण्यासाठी संधीच नसायची. सध्या घरांमध्ये ‘सिमेंट’, ‘टाइल्स’ आणि ‘मार्बल’ लावले जातात. त्यावर शेणाने सारवणे शक्य होत नाही. त्यामुळे किमान गोमूत्र शिंपडणे तरी नियमितपणे करायला हवे.
२ अ. गोमूत्राच्या उपलब्धतेसाठी गोशाळा निर्माण होणे आवश्यक ! : गोमूत्र सहजतेने मिळावे, यासाठी गोमातेचे पालन करायला पाहिजे. आज अधिकांश गोशाळा शासकीय अनुदानातून देशी गायीसारख्याच अनाथ, रुग्ण किंवा रस्त्यात फिरणार्या गायींनासुद्धा पाळतात आणि दोन्हींचे मूत्र एकत्र मिसळतात; पण अशा गोमूत्रामुळे कोणताच लाभ होत नाही. त्यामुळे स्वतःच्या घरी किंवा आसपास गोशाळा निर्माण करायला पाहिजे. तेथे सेवा करायला पाहिजे. त्यातून आपल्याला गोमूत्र सहजतेने उपलब्ध होईल.
२ आ. गायीच्या तुपाच्या दिव्यामुळे वास्तूशुद्धी होऊन घरात देवत्व निर्माण होणे : सकाळी आणि संध्याकाळी किमान एक घंट्यासाठी देशी गायीच्या तुपाचा दिवा देवघरात अन् संध्याकाळच्या वेळी तुळशी वृंदावनात लावावा. यामुळे घरात देवत्व निर्माण होईल. संध्याकाळच्या वेळी तो दिवा आणि भीमसेनी कर्पूरारती घरातील सर्व खोल्यांमध्ये दाखवल्यामुळे नकारात्मक स्पंदने दूर होऊन तेथे देवतेचे तत्त्व सहजपणे आकर्षित होते.