५ जून या दिवशी ‘जागतिक पर्यावरणदिन’ झाला. सध्या ‘कधी एकदा हा उन्हाळा संपतो आणि पाऊस चालू होतो’, असे सर्वांना झाले आहे. वाढत्या उष्णतेने सारी भूमीच तापून गेली आहे. तापमानवाढीच्या या समस्येवर उपाययोजना म्हणून बहुतांश ठिकाणी ‘झाडे लावा, झाडे जगवा’, हाच संदेश दिला जातो. अशाच एका व्हिडिओमध्ये एक तरुण हातामध्ये ‘मोफत झाडे’ असा फलक घेऊन रस्त्याच्या कडेला उभा असलेला दिसतो. ते वाचून काही दुचाकीस्वार आणि अन्य काही लोक तिथे थांबून त्याच्याकडून झाडे, मध्यम आकाराची रोपे घरी घेऊन जातांना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एका टेंपोमध्ये काही स्वयंसेवक रोपे विनामूल्य वाटत असतांना दिसत आहेत. तापमानवाढीवर ‘झाडे लावा, झाडे जगवा’, हा एक प्रभावी उपाय म्हणून प्रसारित होत आहे. एकीकडे २१ व्या शतकामध्ये जग प्रचंड वेगाने प्रगती करत आहे, तर दुसरीकडे या प्रगतीच्या वेगातूनच निर्माण झालेल्या ‘ग्लोबल वॉर्मिंग’ (जागतिक तापमान वाढ) या समस्येने संपूर्ण जगावर भीतीचे सावट निर्माण केले आहे. तो आता हाताबाहेरचा चिंतेचा विषय झाला आहे.
सध्या वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे रक्षण करणारा ओझोनचा थर विरळ होत आहे. त्यामुळे सूर्यकिरणातील अतीनील किरणे थेट पृथ्वीवर येण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे पुन्हा अवकाशात फेकली जाणारी उष्णता धरून ठेवली जात आहे. कोळसा, जंगलतोड, कारखाने आणि वाहनातील धूर यांसारख्या अनेक घटकांचा परिणाम म्हणून जागतिक तापमान आज वाढतच चालले आहे. याचे अनेक अनिष्ट परिणाम मानवजातीच्या समोर आवाहन म्हणून उभे रहात आहेत. बर्फ वितळू लागल्याने समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. समुद्रकाठची वस्ती आणि शेतभूमी पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऋतुमानात पालट होऊन पर्जन्याच्या प्रमाण वितरणावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. त्यामुळे शेतभूमीतून होणारे उत्पन्न घटत आहे. आताच येऊन गेलेले धुळीचे वादळ आणि अन्य मोठी वादळे निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. तापमानवाढीमुळे जंगलांना वणवा लागून वृक्ष नष्ट होत आहेत. आता तरी मानवाने या समस्येवर गांभीर्याने ठोस उपाययोजना केली पाहिजे. वाढते प्रदूषण अल्प करण्यासाठी जैविक इंधनाचा वापर केला पाहिजे आणि पारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढवला पाहिजे. झाडे लावणे आणि ती जगवणे ही आज महत्त्वाची आवश्यकता आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, ही योजना प्रत्यक्षात कार्यवाहीत आणली पाहिजे. मानवाने स्वार्थापायी चालवलेली प्रचंड वृक्षतोड थांबायला हवी. एकूण पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल ? याचा विचार सर्वांनी गांभीर्याने करायला हवा.
– सौ. प्रज्ञा जोशी, पनवेल.