रक्ताचा मूळ नमुना अग्रवाल दांपत्याकडे असण्याची शक्यता !

कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ अपघात प्रकरण !

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणी रक्ताचे नमुने पालटण्यात आल्याचे पोलीस चौकशीत समोर आले होते. या प्रकरणी ससूनच्या २ आधुनिक वैद्यांना पोलिसांनी कह्यात घेतले होते, तसेच आरोपी मुलाची आई शिवानी अग्रवाल यांनाही पोलिसांनी अटक केली होती. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डॉ. हळनोर यांनी अल्पवयीन मुलगा आणि इतर यांचे रक्ताचे नमुने घेण्यासाठी वापरलेली सुई (सीरींज) आणि रक्ताचा मूळ नमुना अग्रवाल दांपत्याकडे दिला असल्याची शक्यता आहे, तसेच या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असल्याचीही शक्यता आहे.

आरोपीची मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याची स्वीकृती !

पोलिसांनी १ जून या दिवशी आरोपी अल्पवयीन मुलाची, त्याच्या आईच्या उपस्थितीत चौकशी केली. या चौकशीत अल्पवयीन मुलाने ‘स्वत: मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होतो’, स्वीकृती दिली आहे. ‘या अपघाताविषयी मला फारसे आठवत नाही’, असेही या मुलाने पोलीस अन्वेषणात सांगितले आहे. ‘अल्पवयीन आरोपी मद्य प्राशन करून भरधाव वेगात कार चालवत होता’, अशी माहिती अल्पवयीन मुलाच्या मित्रांनी पोलीस चौकशीत दिली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या दोन्ही मित्रांना पोलीस साक्षीदार करणार असल्याची माहिती मिळत आहे; मात्र याविषयी पुणे पोलिसांकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

कारमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे आस्थापनाच्या अधिकृत तपासणी अहवालातून झाले स्पष्ट !

अपघात झालेल्या पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांनी केली होती; मात्र कारमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. पोर्शे आस्थापनाने केलेल्या अधिकृत तपासणीच्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली आहे. कारमध्ये लावण्यात आलेला ‘सीसीटिव्ही’ही पडताळण्यात आला आहे. आस्थापनाकडून अधिकृत अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे.