‘स्वातंत्र्यवीर’ उपाधी चेष्टेची नाही, तर सन्मानाची गोष्ट आहे ! – सुभाष राठी, जिल्हाध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

बोलतांना श्री. सुभाष राठी आणि व्यासपिठावर अन्य मान्यवर

वर्धा, ३ जून (वार्ता.) – आजपर्यंत संपूर्ण जगात कुणालाही न मिळालेली ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी वि.दा. सावरकर यांना भारतीय समाजाकडून दिली गेली. ती आम्हा भारतियांसाठी सन्मानाची आणि अभिमानाची घटना होय. सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ उत्स्फूर्तपणे म्हटले गेले; कारण त्यांनी बालवयात स्वातंत्र्यासाठी घेतलेल्या ज्वालाग्राही प्रतिज्ञेपासून ते आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत मातृभूमीविना अन्य कशाचेही चिंतन केले नाही. हाल, छळ, अपमान, वेदना, परिस्थितीचे आक्रमण, स्वजनांच्या मृत्यूचे दुःख, हे सारे सहन करतांना हा राष्ट्र्रभक्त ना कधी कुणापुढे झुकला, ना हरला, ना लाचार झाला. उलट या परिस्थितीत त्यांची चेतना आणि प्रतिभा अधिक उफाळून येत असे. त्यांनी जे अमर साहित्य निर्माण केले, ते भारताला पुढील अनंतकाळापर्यंत मार्गदर्शन करणारे असेच असल्याने त्यांना दिलेली उपाधी ही अतिशय वास्तविक आहे. त्या उपाधीची चेष्टा करणारे राजकीय नेते हे स्वार्थापोटी चेष्टा करण्याचे महापातक करत असून जनतेने त्यांना कदापी क्षमा करता कामा नये, असे प्रतिपादन ‘साई मंदिर देवस्थान’चे सचिव, तसेच विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठी यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती’च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी व्यासपिठावर ‘सामाजिक सेवारत्न’ सन्मानाचे मानकरी डॉ. राजेश आसमवार, ‘ज्येष्ठ नागरिक’ सन्मानचे मानकरी डॉ. राममोहन बेंदूर, ‘स्वा. सावरकर सामाजिक सेवा समिती’चे अध्यक्ष श्याम देशपांडे, ‘सावरकर समिती’चे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बोरकर, ‘सावरकर पुतळा समिती’चे अध्यक्ष हरिभाऊ वझुरकर, सार्वजनिक वाचनालयाचे सचिव गौरीशंकर टिबडीवाल आदी उपस्थित होते.

आरंभी संस्कार भारतीच्या केतकी कुलकर्णी आणि कवी नेसन यांनी सावरकर रचित ‘अखिल हिंदू विजयी ध्वज हा’ हे गीत सादर केले. या प्रसंगी सामाजिक कार्याविषयी डॉ. राजेश आसमवार यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवारत्न अाणि संस्कार भारतीचे डॉ. राममोहन बेंदूर यांना ‘ज्येष्ठ नागरिक’ सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना जनहित मंचाचे सचिव डॉ. आसमवार म्हणाले, ‘‘ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाप्रती आपले काहीतरी योगदान असलेच पाहिजे. आपल्या क्षमतेनुसार वेळ, पैसा, परिश्रम आदी कार्य करणार्‍यांना सहकार्य करण्याची भूमिका न ठेवता केवळ घर आणि संसार पहाणे, हे कृतघ्नपणाचे लक्षण होय.’’ या वेळी त्यांना मिळालेला सन्मान त्यांनी जनहित मंचाला अर्पित केला.

क्षणचित्रे

१. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नमंजुषा स्पर्धेत १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केल्यानिमित्त शेतकरी संघटनेचे पांडुरंग भालशंकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

२. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त परभणी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर कुळकर्णी आणि सौ. वीणा मांडाखळीकर यांनी राष्ट्रीय कीर्तनकार स्वर्गीय गोविंद स्वामी आफळे रचित ‘गाथा सावरकर’ हा संगीतबद्ध गायनाचा कार्यक्रम सादर केला.