कोल्हापूर, ३ जून (वार्ता.) – अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि ‘दुर्गराज रायगड’ प्रतिवर्षी रायगडावर भव्यदिव्य शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा करण्यात येतो. यंदाचे हे ३५० वे वर्ष असून या सोहळ्याच्या निमित्ताने ‘कोल्हापूर हायकर्स’ची ‘पवित्र जल संकलन’ मोहीम राबवत आहे. यासाठी १ मेपासून देशभरातील विविध ठिकाणांहून हे जल संकलित करण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती ‘कोल्हापूर हायकर्स’चे संस्थापक श्री. सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी श्रावणी पाटील, विजय ससे, डॉ. राजेंद्र भस्मे यांसह अन्य उपस्थित होते.
श्री. सागर म्हणाले, ‘‘संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ऐतिहासिक दृष्टीने महत्त्व आहेच; म्हणून या राज्याभिषेक सोहळ्याची सिद्धता आम्ही आधीपासूनच करत असतो. अशा प्रकारे सह्याद्री पर्वतरांगा आणि हिमालयातून ट्रेकिंग करून प्रत्येक वर्षी ‘कोल्हापूर हायकर्स’चे मावळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हे जल आणतात. विविध ठिकाणांहून आणलेले हे पवित्र जल एकत्रित करून ५ जूनला रायगडावर पोचवणार आहोत.’’