BSF Soldiers Attacked : बांगलादेशी तस्करांकडून सीमेवर भारतीय सैनिकाला मारहाण

सीमापार ओढून नेण्याचा केला प्रयत्न

कोलकाता (बंगाल) – भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असणार्‍या भोले या भारतीय सैनिकाला बांगलादेशी तस्करांनी मारहाण करून त्याला सीमापार नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना २ जूनला दुपारी १ च्या सुमारास घडली, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाकडून देण्यात आली. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी यासंदर्भात बांगलादेशाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधत विरोध दर्शवला.

ए.एन्.आय. वृत्तसंस्थेने सीमा सुरक्षा दलाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार सैनिक भोले भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असतांना बांगलादेशी तस्करांची टोळी बांगलादेशाची सीमा ओलांडून त्या ठिकाणी आली. साखरेची तस्करी करण्याच्या उद्देशाने टोळीतील तस्कर त्या ठिकाणी आले होते. त्या वेळी या तस्करांनी भोले यांना अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांना घेरले. तसेच या तस्करांनी भोले यांना बांबूने आणि लोखंडी सळीने मारहाण केली. भोले यांना ओढत बांगलादेशात नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भोले यांच्याकडील रेडिओ सेट आणि रायफस हिसकावली; मात्र त्याच वेळी भोले त्यांच्या तावडीतून सुटण्यास यशस्वी झाले. या घटनेत भोले घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. भोले यांच्याकडील रायफल आणि रेडिओ सेट बांगलादेशाच्या अधिकार्‍यांनी भारताला परत केले आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात तस्करी होते, हे जगजाहीर असतांना भारत त्यांंचा निःपात का करत नाही ?