सामाजिक माध्यमांमध्ये इंग्रजी भाषेतील एक ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला होता. या ‘व्हिडिओ’मध्ये वर्तमानकाळाची स्थिती वस्तूनिष्ठपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आज उच्च शिक्षणाची काही न्यूनता नाही; पण त्यासमवेत असलेल्या सामान्यज्ञानाचा कित्येकदा अभाव जाणवतो. सामाजिक माध्यमांवर मोठी ‘फ्रेंडलिस्ट’ (मित्रांची सूची) असते; पण खर्या आयुष्यात एकही चांगला मित्र नसतो ! घर तर अनेक मोठ्या खोल्यांचे आहे; पण त्यात केवळ पती-पत्नी आणि मुले यांनाच जागा. एकत्र कुटुंबापासून हे घर दूर आहे. मासिक उत्पन्न भरपूर आहे; पण मानसिक शांतता नाही. हातात महागडे घड्याळ आहे; पण वेळ नाही. ना स्वत:साठी, ना कुटुंबासाठी, ना आरोग्यासाठी आणि ना अध्यात्मासाठी. उच्च बुद्धीमत्ता आहे; पण संवेदनशीलता अल्प आहे. आज वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे काही चांगल्या समाजाचे लक्षण नव्हे. समाज, राष्ट्र, धर्म यांवर अनेक आघात होत आहेत. आधुनिक आणि महागडी औषधे आहेत; पण तरीही निरोगी आरोग्य कुठे आहे ? आज आपण चंद्रापर्यंत पोचलो, याचा सार्थ अभिमान बाळगतो; पण शेजारी कोण रहाते, हे माहिती नाही, अशीही बर्याच जणांची स्थिती असते.
वरील विषय त्या व्हिडिओत आहेत. ते पाहून आपण अंतर्मुख होतो. अशा प्रगतीला काही अर्थ आहे का ? ज्यामुळे व्यक्ती कुटुंब, समाज, धर्म यांपासून दूर जाते. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य हरवते. हे सर्व केवळ भौतिक सुख आहे. शारीरिक हानीत निरोगी आरोग्याचा अभाव, मोकळेपणाने बोलायला कुणी नसल्याने भावनांचा योग्य निचरा होत नाही. परिणामी मानसिक आरोग्य बिघडून त्याचा परिणाम शरिरावरही होतो. माणसाचे समाधान न्यून झाल्याने त्याचा हव्यास वाढला आहे. पैसा, सुखासीन जीवनाची अभिलाषा, इतरांशी तुलना या विचारांच्या अधीन होऊन मनुष्य संस्कार, नामसाधना, आध्यात्मिक स्तरावरील जीवन जगणे यांपासून दूर जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या ‘ने मजसी ने’ या कवितेत म्हटले आहे, ‘गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे । परि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा ।।’, म्हणजे ‘माझ्या ज्ञानाचा उपयोग जर मातृभूमीसाठी होत नसेल, तर ते ज्ञान व्यर्थ आहे.’ आज असा किती जण विचार करतात ? हिंदु धर्मात देव, ऋषि, पितृ आणि समाज हे ४ ऋण सांगितले आहेत. आधुनिकता आणि पाश्चिमात्य आकर्षण यांमुळे भारतीय व्यक्ती तिच्या मूळ संस्कृतीपासून दूर जात आहे. परिणामी सर्व स्तरांवरील स्वास्थ्याला मुकावे लागत आहे. खरेतर आपण एक वित पोटाची खळगी भरण्यासाठी; मात्र त्या नादात काय गमावत अन् कमावत आहोत ? इकडे लक्ष मात्र असले पाहिजे !
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी