ठाणे – गेल्या ३ दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील रेल्वेस्थानकात चालू असलेला लोकलचा ३६ घंट्यांचा मेगाब्लॉक २ जून या दिवशी संपला. दोन्ही मेगाब्लॉक संपल्याची घोषणा रेल्वेने केली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकातून पहिली धीम्या गतीची लोकलगाडी, तर आसनगावला जाणारी जलदगतीची लोकल रवाना झाली. हार्बर मार्गावरील पहिली लोकलगाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पनवेलच्या दिशेने रवाना झाली.
रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेगामुळे काम ठरवलेल्या वेळेपेक्षा आधीच पूर्ण झाले. या कामांच्या अंतर्गत ट्रॅक बाजूला सरकवणे, ओव्हरहेड वायर यंत्रणा उभी करणे, सिग्नलिंग यंत्रणा उभी करणे, पॉईंट्स सिद्ध करणे अशी महत्त्वाची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. प्लॅटफॉर्म रूंदीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. लवकरच नवीन फलाट वापरासाठी खुला केला जाईल.