मद्य घेतल्याचा तक्रारदाराचा आरोप !
पिंपरी (जिल्हा पुणे) – मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन्.के. पाटील यांनी ‘शांताई सिटी सेंटर’ समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या २ गाड्यांना धडक दिली. धडक दिल्यानंतर ते घटनास्थळी न थांबता घरी निघून गेले; मात्र पोलिसांनी त्यांना घरात जाऊन कह्यात घेतले. ही घटना १ जून या दिवशी सायंकाळी ५ वाजता घडली. मुख्याधिकारी पाटील यांना मद्य घेतल्याचा आरोप असून त्यांच्या रक्ताचे नमुने पडताळणीसाठी कह्यात घेतले आहेत. या प्रकरणी सिद्धराम लोणीकर यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
तळेगाव दाभाडे येथे मुख्याधिकारी पाटील हे स्वतःची खासगी गाडी चालवत होते. त्यांचा गाडीचा वेग पुष्कळ होता. त्यांनी वेगात समोर असलेल्या चारचाकीला आणि आणखी एका वाहनाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, यात समोरच्या दोन्ही वाहनांची मोठी हानी झाली आहे. अपघातानंतर मुख्याधिकारी घटनास्थळावरून थेट आपल्या घरी गेले आणि दार लावून बसले. कारवाईच्या भीतीने त्यांनी काही वेळ दार उघडले नाही; मात्र नंतर त्यांनी दार उघडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.