अखेर ८ दिवसांत कामे पूर्ण करण्याची जिल्हाधिकार्यांची सूचना
वैभववाडी – कोल्हापूर गगनबावडामार्गे वैभववाडीला जोडणार्या करूळ घाटाच्या दुरुस्तीच्या कामांना मुदतवाढ देऊनही अद्यापपर्यंत केवळ ५० टक्के काम करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी घाटाची पहाणी करून ‘अपूर्ण कामे १० जूनपर्यंत पूर्ण करा. योग्य नियोजन करून घाटातील वाहतूक चालू करण्यासाठी प्रयत्न करा’, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि मार्गाचे काम करणार्या ठेकेदार आस्थापनाचे अधिकारी यांना केली.
जिल्हाधिकारी तावडे यांनी ३१ मे या दिवशी करूळ घाटात चालू असलेल्या कामाची पहाणी केली. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण जाधव, उपअभियंता अतुल शिवनिवार, नायब तहसीलदार दिग्विजय पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जोशी आदी उपस्थित होते.
नागमोडी वळणे, एका बाजूला दरड आणि दुसर्या बाजूला खोल दरी यांमुळे करूळ घाटाचे काम करतांना वाहतूक चालू ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकार्यांकडे अनुमती मागितली होती. त्यानुसार २२ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार वाहतूक बंद ठेवूनही घाटातील काम अपेक्षित गतीने न झाल्याने वाहतूक बंद ठेवण्याचा कालावधी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. १६ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकार्यांनी घाटातील कामाची प्रत्यक्ष पहाणी केली आणि ‘३१ मेपर्यंत कामे पूर्ण करून वाहतूक चालू करण्यासाठी प्रयत्न करा’, अशी सूचना दिली होती. त्यामुळे ३१ मे या दिवशी जिल्हाधिकार्यांनी घाटाची पहाणी केली असता ५० टक्केच काम पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा कामाचा कालावधी वाढवून १० जूनपर्यंत काम पूर्ण करून वाहतूक लवकरात लवकर चालू करण्याची सूचना केली आहे.