काणकोण येथील युवकाला अटक
काणकोण, १ जून (वार्ता.) – मडगाव येथील एका महिलेची बनावट इन्स्टाग्राम खात्यावरून सतावणूक केल्याच्या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी काणकोण येथील एका २० वर्षीय युवकाला अटक केली आहे. विनय गावकर असे या युवकाचे नाव असून तो नाने, गावडोंगरी येथील रहिवासी आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार या युवकाने आक्षू जगताप या नावाने बनावट ‘इन्स्टाग्राम’ खाते सिद्ध केले आणि मडगाव येथील एका महिलेशी मैत्री केली. त्यांनतर त्याने या खात्यावरून त्या महिलेला अश्लील संभाषणे आणि चित्रफिती पाठवून तिला लैंगिक संबंधांविषयी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ आणि ६७ अ या कलमांतर्गत सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सामाजिक माध्यमातून संपर्क करतांना नागरिकांनी सुरक्षेसाठी संपर्क करणार्याचे खाते अधिकृत आहे कि नाही, याची निश्चिती करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपादकीय भूमिकाधर्मशिक्षणाअभावी नैतिक मूल्यांचा र्हास झाल्याने युवा पिढी किती अधोगतीला गेली आहे, ते यातून दिसून येते ! |