India Heatwave : देशात उष्माघातामुळे ७ राज्यांत ३२० हून अधिक लोकांचा मृत्यू

मतदानाच्या कामात असणार्‍या २५ कर्मचार्‍यांचा मृत्यू

नवी देहली – गेल्या ४ दिवसांत उष्णता आणि उष्माघात यांमुळे ७ राज्यांत ३२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातही मतदान प्रक्रियेमध्ये काम करत असलेल्या २५ कर्मचार्‍यांचा एकाच दिवशी उष्माघातामुळे मृत्यू झाला.

१. उत्तरप्रदेशात गेल्या ३ दिवसांत १०० लोकांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये गेल्या २ दिवसांत ६३ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये ६०, झारखंडमध्ये ३७, ओडिशात १८, मध्यप्रदेशात २ आणि देहली येथे एकाचा गेल्या ४ दिवसांत मृत्यू झाला.

२. झारखंडमध्ये १ सहस्र ३२६ जण उष्माघातामुळे रुग्णालयांत उपचार घेत आहेत. अनेक ठिकाणी उष्माघाताच्या वॉर्डांमध्ये जागाच शिल्लक नाही.

३. वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कारासाठी प्रतिदिन ५ पट अधिक मृतदेह येत आहेत. महास्मशान सेवा समितीचे सरचिटणीस बिहारीलाल गुप्ता म्हणाले, ‘‘गेल्या २ दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे ताण वाढला आहे.’’ डोम राजा ओम चौधरी म्हणाले की, कोरोना महामारीच्या कालावधीनंतर प्रथमच अंत्यसंस्कारासाठी एवढी मोठी गर्दी वाढली आहे.

४. अयोध्येत गेल्या ५ दिवसांत २१ बेवारस मृतदेह सापडले आहेत. उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.