१. ईश्वराप्रतीचा भाव
‘ज्या भावजागृतीने अध्यात्मात ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी उत्साह मिळतो आणि साधक गुरु (ईश्वराचे सगुण रूप) करत असलेल्या कार्यात प्रत्यक्ष कृतीशील होतो, तो खरा ‘ईश्वराप्रतीचा भाव’ आहे.’
२. सध्या घरात एकटे बसून देवाप्रतीचा भाव अनुभवण्यापेक्षा समाजहिताच्या माध्यमातून ईश्वराच्या व्यापक रूपाचे दर्शन करवून देणारा ‘समष्टी भाव’ काळानुसार अधिक आवश्यक असणे
‘सत्ययुगात ‘सोहंभाव’च कार्यरत असल्याने त्या वेळी सर्व जण व्यष्टी भावात रहात असत. तेव्हा सर्व जण सात्त्विक असल्याने अध्यात्मप्रसाराची आवश्यकता नव्हती; परंतु आता काळ पालटला, तसे साधनेचे प्रयत्नही पालटले. कलियुगामध्ये काळानुसार ‘समष्टी भावा’ची आवश्यकता अधिक आहे. सध्या सर्वत्रची स्थिती चिंताजनक आहे. कुणालाही धर्मशिक्षण नाही. धर्माविषयी सर्वच अज्ञानी आहेत. त्यासाठी ‘समाजामध्ये अध्यात्मप्रसार करून धर्म आणि राष्ट्र यांच्या उत्थापनार्थ करावयाची सेवा’ या संदर्भात जागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे. मी आणि माझा देव किंवा केवळ भजन-कीर्तन यांपुरता श्रवणभाव, या मर्यादारेषेतून बाहेर यावे लागेल. घरात बसून स्वतःसाठी नामजप करण्याचा काळ निघून गेला आहे. आता स्वतः समवेत समाजातील लोकांनाही आध्यात्मिक स्तरावर साक्षर करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी देवासमोर बसून नव्हे, तर देवाचे रूप असलेल्या समष्टीच्या समोर आपल्याला अध्यात्माचे महत्त्व सांगून लोकांना साधनेत कृतीशील करावे लागेल. ‘समाजातील लोकांनाही आनंदी आध्यात्मिक जीवन जगता येण्यास मिळेल’, असा आपला प्रयत्न हवा. घरात एकटे बसून देवाप्रतीचा भाव अनुभवण्यापेक्षा संपूर्ण समाजाला साधनेसाठी दिशा देण्यात कृतीशील व्हायला हवे. समाजहिताच्या माध्यमातून ईश्वराच्या व्यापक रूपाचे दर्शन करवून देणारा ‘समष्टी भाव’ हा काळानुसार अधिक आवश्यक आहे !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ