सातारा, ३१ मे (वार्ता.) : महावितरण आस्थापनाने १० टक्के दरवाढ केल्यामुळे याचा फटका लघु, मध्यम आणि मोठे उद्योग यांना बसणार आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून या विरोधात सातारा येथील उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. उद्योजकांनी या दरवाढीचा निषेध केला आहे. जिल्ह्यासह राज्यातील औद्योगिक संघटनांची भूमिका जाणून घेतल्यानंतर आंदोलनाचा पवित्रा निश्चित केला जाणार आहे. वीज नियामक आयोगाने ३ वर्षांसाठी क्रमाक्रमाने केलेली ही दरवाढ मान्य नसल्याचेही उद्योजकांनी स्पष्ट केले आहे.
एका बाजूला ‘एक देश, एक कर’, योजना राबवण्यात येत आहे; मात्र दुसर्या बाजूला प्रत्येक राज्यात वीज शुल्क वेगवेगळे आकारले जात आहे. महाराष्ट्रात शेजारील राज्याच्या तुलनेत अधिक दर असल्यामुळे मोठे उद्योग समूह राज्यात येण्यास सिद्ध नाहीत. त्यामुळे औद्योगिक विकास खुंटत आहे. महावितरण आस्थापनाच्या गलथान कारभाराविषयी आतापर्यंत उद्योजक सामंजस्याची भूमिका घेत होते; मात्र महावितरण आता वीज नियामक आयोगाच्या साहाय्याने लघु, मध्यम आणि मोठे उद्योग संपवण्यासाठी काम करत असल्याचा संताप उद्योजकांकडून व्यक्त केला जात आहे.