पुणे येथील कल्याणीनगर ‘पोर्शे’कार अपघात प्रकरण !
पुणे – कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीचे रक्ताचे नमुने पालटले, तर त्याच्यासह असलेल्या अन्य २ अल्पवयीन मुलांचेही रक्ताचे नमुने पालटल्याची माहिती समोर येत आहे. या ३ मुलांचा जो रक्तगट आहे, त्याच रक्तगटाच्या अन्य ३ जणांना बोलावून त्यांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयामध्ये घेण्यात आले. रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी आधुनिक वैद्यांनी त्या ३ जणांचे रक्ताचे नमुने घेतले. ते कशासाठी घेतले ? याची गोपनीयता डॉ. श्रीहरि हळनोर यांनी राखली होती. अपघातातील ३ अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने हे ‘सी.सी.टी.व्ही.’ नसलेल्या खोलीमध्ये घेण्यात आले, अशी माहिती गुन्हे अन्वेषण अधिकार्यांनी न्यायालयामध्ये दिली.
ज्या ठिकाणी रक्ताचे नमुने घेण्यात आले, त्या ठिकाणचा पंचनामाही करण्यात आला आहे. त्या परिसरातील ‘सी.सी.टी.व्ही.’ चित्रीकरणामध्ये डॉ. श्रीहरि हळनोर आणि घटकांबळे यांच्यासह अन्य काही साक्षीदार दिसत आहेत. त्या वेळी झालेल्या संवादाचे ‘सी.डी.आर्.’सुद्धा (तांत्रिक विश्लेषण) जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती न्यायालयामध्ये देण्यात आली आहे.
डॉ. श्रीहरि हळनोर यांच्याकडून दबावाखाली नमुने पालटल्याची स्वीकृती
डॉ. अजय तावरे यांच्या दबावाखाली आपण रक्ताचे नमुने पालटले. त्याची माहिती आपण वरिष्ठांना दिली होती. ही कृती केल्यापासून २ दिवस मला झोप लागली नव्हती. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, अशी कबुली डॉ. श्रीहरि हळनोर यांनी पोलिसांसमोर दिली आहे.
पालटलेल्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये महिलेचे रक्त !
अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ‘ससून’मधील आधुनिक वैद्यांनी मुलाऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने पडताळणीसाठी पाठवल्याचे अन्वेषणामध्ये उघडकीस झाले आहे. ही महिला कोण होती ? त्याचे अन्वेषण चालू आहे. हे रक्त मुख्य आरोपीच्या आईचे म्हणजे शिवानी अग्रवाल यांचे असल्याचा संशय होता; परंतु ते रक्ताचे नमुने त्यांचे नसल्याचे समोर येत आहे.
दोषींना सोडणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
अपघात प्रकरणांवरून विरोधकांनी राज्य सरकारला खडसावले आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यापैकी कुणालाही सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप !
राष्ट्रीय काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना भ्रमणभाष केला होता ? त्यांना काय आदेश दिले ? ते उघड झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या नार्काे चाचणीची मागणीही दमानिया यांनी केली आहे.