FSSAI On Human Milk : आईच्या दुधाच्या विक्रीला अनुमती नसल्याने राज्यांनी मानवी दुधाचे व्यापारीकरण थांबवावे

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफ्.एस्.एस्.ए.आय.’ने) दिले निर्देश !

नवी देहली – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफ्.एस्.एस्.ए.आय.’ने) स्पष्ट केले आहे की, देशात आईचे दूध देशात विकता येणार नाही. प्राधिकरणाने राज्यांना मानवी दुधावर प्रक्रिया आणि विक्रीसाठी परवाने देणे अन् मानवी दुधाचे व्यापारीकरण थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. ‘ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया’ने सरकारला अशा आस्थापनांवर  कारवाई करण्याची विनंती केली आहे.

१. यासंदर्भात प्रसारित करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये प्राधिकरणाने म्हटले आहे की, मानवी दुधावर प्रक्रिया करून त्याची विक्री करणे चुकीचे आहे. याखेरीज आईच्या दुधाचा व्यावसायिक वापर बेकायदेशीर आहे. काही आस्थापने दुग्धजन्य पदार्थांच्या नावाखाली मानवी दुधाचा व्यापार करत आहेत.

२. ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ने अन्न सुरक्षेच्या संदर्भातील कायद्याच्या अंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार मानवी दुधावर प्रक्रिया आणि विक्रीसाठी अनुमती दिलेली नाही. त्यामुळे मानवी दूध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांचे व्यापारीकरण त्वरित थांबवावे. नियमांचे उल्लंघन केल्यास ‘फूड बिझनेस ऑपरेटर्स’च्या विरोधात कारवाई करण्यात  येईल. या नियमांचे उल्लंघन केल्यास ५ वर्षे कारावास आणि ५ लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे, असे एफ्.एस्.एस्.ए.आय.’ने म्हटले आहे.