सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पहातांना अकोला येथील साधकांना आलेल्या अनुभूती

११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना अकोला येथील साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सौ. मंदाकिनी भालतिलक

अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी त्यांनी साधकांना विष्णुरूपात दर्शन दिले. तेव्हा माझा पुष्कळ कृतज्ञताभाव दाटून आला.

आ. गुरुमाऊलींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मितहास्य करणारे मुखमंडल मला निरागस बालकाप्रमाणे वाटत होते. ‘या जगात गुरुमाऊलींसारखे तेजस्वी आणि सुंदर असे कुणीच नाही’, असे मला वाटत होते.

इ. गुरुमाऊलींच्या भालप्रदेशावर मला शिवपिंडीचा आकार आणि त्यावर ॐ स्पष्टपणे दिसत होता.’

२. श्याम राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७८ वर्षे)

अ. ‘ब्रह्मोत्सव सोहळ्यात रथारूढ सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींचे रूप डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्यांच्या भालप्रदेशी मला ॐ स्पष्टपणे दिसत होता.

आ. ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी मला पुष्कळ भावलेला सर्वांत हृदयस्पर्शी प्रसंग म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना प्रदान केलेले उत्तराधिकार पत्र ! त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींकडून निळ्या रंगाचे तेजस्वी गोळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे जात आहेत.’ हे सर्व घडत असतांना मला ईशावास्योपनिषदमधील शान्तिपाठ आठवला,

‘ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।’ – ईशावास्योपनिषद्, शान्तिमन्त्र

अर्थ : ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, पूर्णानेच पूर्ण उदयाला येते, पूर्णातून पूर्ण काढून टाकल्यावर पूर्णच उरते.’

(सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म सर्व प्रकारे पूर्ण आहे आणि हे दृश्य जगत् सुद्धा पूर्णच आहे. जरी पूर्ण ब्रह्मातून हे पूर्ण जगत् व्यक्त स्थितीत आलेले असले, तरीही या पूर्ण ब्रह्माच्या पूर्ण स्थितीला बाधा येत नाही. ते आहे, तसेच पूर्ण रहाते.)

विवरण : सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली प्रत्यक्ष नारायणच आहेत, म्हणजेच ते पूर्ण आहेत. त्यांच्यामुळेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पूर्ण उदयास (घडल्या) आल्या आहेत. प.पू. गुरुमाऊलींनी त्यांना आध्यात्मिक उत्तराधिकार पत्र प्रदान केले, तरीही परम पूज्य गुरुमाऊली पूर्णच आहेत. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ गुरुदेवांच्याच शक्ती (श्रुति आणि स्मृति) आहेत अन् हा प्रत्यक्ष भगवंताचा प्रसाद आहे.

इ. अध्यात्माचा मार्ग स्वीकारतांना गुरुदेवांनी सर्वस्वाचा त्याग केला. त्यांनी त्यांचे चिकित्सालयही बंद केले आणि आता त्यांनी स्वतःच स्थापन केलेल्या सनातन संस्थेचे दायित्व श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे सोपवले आहे. ‘हे अध्यात्मातील त्यागाचे अत्युच्य कोटीचे उदाहरण आहे’, असे मला वाटते.

ई. ‘आपल्याकडे सर्व काही असतांनाही जो आनंद मिळत नाही, तो आनंद आपल्याकडे काहीच नसतांना कसा मिळतो ?’, हे मला शिकायला मिळाले. परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणूनच सच्चिदानंद परब्रह्म आहेत.

‘गुरुमाऊलींनीच मला अशा वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती दिल्या आणि माझ्याकडून शब्दबद्ध करून घेतल्या’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १७.७.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक