Chinese Media Praise India : चीन आणि भारत यांचे नागरिक सर्वाधिक आनंदी जीवन जगतात !

चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ नियतकालिकाचा अहवाल !

बीजिंग (चीन) – चीन सरकारचे मुखपत्र असणार्‍या ‘ग्लोबल टाइम्स’ नियतकालिकाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये आनंदी देशांची सूची प्रकाशित करण्यात आली आहे. ‘जी ७’ (कॅनडा, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, इटली आणि जपान) देशांपेक्षा चीन आणि भारत या देशांतील नागरिक अधिक आनंदी जीवन जगतात, असा दावा करण्यात आला आहे.

अहवालानुसार चीनमधील ९१ टक्के लोकांनी असे म्हटले आहे की, ते आनंदी आयुष्य जगत आहेत. त्यानंतर ८४ टक्के भारतियांनी त्यांच्या जीवनशैलीतून समाधान मिळत असल्याचे, तसेच ते आनंदी जीवन जगत आहेत, असे म्हटले आहे. यानंतर अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या देशांतील नागरिकांचा क्रमांक आहे.

अहवालानुसार, आनंदी जीवनाची जागतिक सरासरी ७३ टक्के आहे. चीन (९१ टक्के) आणि भारत (८४ टक्के) सरासरीपेक्षा फार पुढे आहेत. यानंतर अमेरिकेच्या ७६ टक्के लोकांनी त्यांच्या जीवनशैलीवर आनंद व्यक्त केला आहे. यानंतर फ्रान्स आणि कॅनडाची संख्या आहे. दोन्ही देशांच्या ७४ टक्के लोकांनी त्यांच्या जीवनमानानुसार आनंद व्यक्त केला आहे. यानंतर ब्रिटन ७० टक्के, इटली ६८ टक्के, जर्मनी ६७ टक्के आणि ६० टक्के जपान यांचा क्रमांक आहे.

अहवाल २२ सहस्र लोकांशी झालेल्या संभाषणावर आधारित

ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, आनंदाविषयीचा हा अहवाल २२ सहस्र ५०८ लोकांशी झालेल्या संभाषणावर आधारित आहे. या नियतकालिकाने ३२ देशांतील १८ ते ७५ वर्षे वयोगटातील २२ सहस्र ५०८ लोकांची ऑनलाईन मुलाखत घेतली. मुलाखतीत या लोकांना विचारले गेले की, ‘ते त्यांच्या जीवनशैलीनुसार किती आनंदी आहेत ?’ यामध्ये चिनी लोकांनी त्यांच्या जीवनातून सर्वाधिक आनंद व्यक्त केला. यानंतर भारताच्या लोकांनी त्यांच्या जीवनाविषयी समाधान व्यक्त केले.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात भारत १२६ व्या क्रमांकावर !

यावर्षी मार्चमध्ये प्रकाशित झालेल्या ‘यूएन् वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट’मध्ये चीनचा प्रमुख देशांमध्ये समावेश नव्हता. जगातील सर्वाधिक आनंदी देशांच्या या सूचीमध्ये फिनलँडला प्रथम क्रमांक मिळाला. फिनलँड नंतरची दुसरा क्रमांक डेन्मार्क आहे. आईसलँड तिसरा आहे आणि स्वीडन या सूचीतत चौथ्या क्रमांकावर आहे. इस्रायल ५ व्या क्रमांकावर आहे. भारताला १३३ देशांच्या या सूचीमध्ये १२६ वे स्थान मिळाले आहे.

संपादकीय भूमिका

चीनच्या मुखपत्राने केलेल्या या दाव्यात भारताला वरचे स्थान मिळणे, हे आश्‍चर्यकारकच म्हणावे लागेल ! यातून चीनच्या शासनकर्त्यांना आनंद झाला का ? हाच खरा प्रश्‍न आहे !