UK FTA With India : ब्रिटन सरकार भारतासमवेत मुक्त व्यापार करार करू शकले नाही !

ब्रिटनमधील विरोधी पक्षांचे विधान

मजूर पक्षाचे खासदर डेव्हिड लॅमी

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील हुजूर (कंझर्व्हेटिव्ह) पक्ष वर्ष २०१० पासून सत्तेत आहे. आतापर्यंत अनेक दिवाळी उलटून गेल्या; पण या पक्षाने भारतासमवेत मुक्त व्यापार करार केलेला नाही. भारतासमवेतच्या संबंधांविषयी त्यांनी नेहमीच मोठमोठी आश्‍वासने दिली; परंतु ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत. जर आमचा मजूर (लेबर) पक्ष सत्तेवर आला, तर तो भारतासमवेत मुक्त व्यापार करारावर प्राधान्याने काम करील. याखेरीज ब्रिटन आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीही पुढे नेण्यात येईल, असे विधान मजूर पक्षाचे खासदर डेव्हिड लॅमी यांनी म्हटले आहे. ‘देशाच्या हिताचा असेल, तेव्हाच भारतासमवेत मुक्त व्यापार करार करणार’, असे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सांगितले होते.

लंडनमधील ‘इंडिया ग्लोबल फोरम’ला संबोधित करतांना डेव्हिड म्हणाले की, आम्हाला भारतासमवेतचे व्यापार संबंध पुन्हा स्थापन करण्याची आवश्यकता आहे. मी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना आवाहन करतो की, त्यांनी शक्य तितक्या लवकर आम्हाला साहाय्य करावे. मजूर पक्ष यासाठी सिद्ध आहे. सरकारमध्ये कुणीही असो, आमचे भारतासमवेतचे संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत. आज भारत आमचा १२ वा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. आम्हाला हे पालटायचे आहे.