US Oppose Hindu Temple : अमेरिकेत हिंदु मंदिराचे बांधकाम रोखण्यासाठी पालटले नियम !

मंदिर बांधण्यासाठी पूर्वी दिलेली अनुमती नियम पालटून रहित !

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतासह संपूर्ण जगाला धार्मिक स्वातंत्र्याविषयी उपदेशाचे डोस पाजण्यात अमेरिका आघाडीवर आहे; पण स्वतःच्याच देशातील अल्पसंख्यांकांच्या संदर्भात अमेरिका पाकिस्तानच्याच वाटेवर आहे. ज्याप्रमाणे पाकिस्तान इस्लामाबादमध्ये हिंदु मंदिर बांधण्यास अनुमती देत नाही, त्याचप्रमाणे अमेरिकेतील लास वेगासमधील हेंडरसन शहरातील हिंदूंना मंदिर बांधण्यास प्रशासनाने दिलेली अनुमती मागे घेतली आहे. अनुमती दिल्यानंतर मंदिराचे बांधकाम चालू झाले होते; परंतु वर्षभरातच स्थानिक नगर परिषदेने ही अनुमती मागे घेतली. त्यासाठी परिषदेने नियम पालटले. आता तेथील हिंदू पुन्हा अनुमती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

‘मंदिरामुळे ग्रामीण संवर्धनाला हानी पोचेल’ असा दावा करून मंदिराला विरोध !

‘आनंद उत्सव’ नावाचे हे हिंदु मंदिर हेंडरसनमधील ग्रामीण भागात ५ एकर जागेवर बांधले जाणार आहे; परंतु स्थानिक रहिवाशांच्या विरोधाचा संदर्भ देत नगर परिषदेने वर्ष २०२२ मध्येच अनुमती मागे घेतली. ‘अमेरिकन हिंदु असोसिएशन’च्या संस्थापकांपैकी एक असलेले श्री. सतीश भटनागर यांनी याविषयी माहिती देतांना सांगितले की, हेंडरसन हे हिंदूंसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. भटनागर आणि बाबा अनल यांनी ही भूमी ४ लाख डॉलर्सपेक्षा (३ कोटी ३२ लाख रुपयांहून अधिक) अधिक किमतीत विकत घेतली होती. हेंडरसनमधील समरलिन भागामध्ये एक हिंदु मंदिर असल्याने आम्हाला शहराच्या अन्य भागातही हिंदूंसाठी मंदिर हवे होते. हिंदु समितीचे अनुमाने १ लाख सदस्य आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये मंदिराला अनुमती देण्यात आल्यानंतर  स्थानिक रहिवाशांनी त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये या अनुमतीला आव्हान दिले आणि दावा केला की, या मंदिरामुळे ग्रामीण संवर्धनाला हानी पोचेल; मात्र त्याच परिसरात ३ चर्च आधीपासूनच अस्तित्वात आहेत.

आक्षेपानंतर मंदिर समितीने अनेक पालट केले !

यानंतर रहिवाशांची चिंता लक्षात घेऊन मंदिर समितीने मंदिराची उंची आणि वाहनतळाची जागा या संदर्भात काही पालट केले. सर्व गोष्टी किमान पातळीवर आणल्या.  त्यानंतर नगर परिषदेने रहिवाशांचे आव्हान ४ विरुद्ध १ या मताने फेटाळले आणि ‘अमेरिकन हिंदु असोसिएशन’ला एक वर्षासाठी सशर्त अनुमती दिली. मंदिर समितीनेही मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ केला होता; परंतु अनुमतीची समयमर्यादा संपण्याच्या एक महिना आधी नगर परिषदेने नियम पालटले, त्यानंतर या परिसरात धार्मिक सुविधांवर बंदी घालण्यात आली.

बाबा अनल यांनी सांगितले की, अभियंत्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आता अनावश्यक अडथळे निर्माण केले गेले आहेत. अनुमती वाढवून देण्याच्या ‘अमेरिकन हिंदु असोसिएशन’च्या मागणीला हेंडरसन नगर परिषदेने नकार दिला.

संपादकीय भूमिका 

अमेरिका भारताचा मित्र होऊ शकत नाही, हे यातून पुन्हा सिद्ध होते. अमेरिका हा एक विश्वासघातकी, स्वार्थी आणि संधीसाधू देश आहे, हे भारतियांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे !