नागपूर विद्यापीठ विद्यार्थ्यांना देणार हिंदु संस्कृतीचे शिक्षण !

‘हिंदु धर्म संस्कृती मंदिरा’समवेत केला सामंजस्य करार !

नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विद्यार्थ्यांना हिंदु संस्कृतीचे शिक्षण देणार आहे. विद्यापिठाच्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना आता भारतीय ज्ञानपरंपरेचे संशोधन, तसेच विस्तृत ज्ञान प्राप्त करणे शक्य होणार आहे. याविषयी ‘हिंदु धर्म संस्कृती मंदिरा’समवेत विद्यापिठाने सामंजस्य करार केला आहे. कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे आयोजित कार्यक्रमात या सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले.

भारतातील वैविध्यपूर्ण अशा प्राचीन ज्ञानाचा विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, तत्कालीन प्रगत भारतीय ज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा’ याचा समावेश करण्यात आला आहे. एन्.ई.पी. २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरा अभ्यासता यावी, यावर अधिक संशोधन करता यावे म्हणून विद्यापिठाने हिंदु धर्म संस्कृती मंदिरासमवेत सामंजस्य करार केल्याचे विद्यापिठाने त्यांच्या निवेदनात सांगितले आहे.

‘हिंदु धर्म संस्कृती मंदिर’ या संस्थेकडे प्राचीन ग्रंथसंपदेचे मोठे असे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयामध्ये साधारणतः ७० सहस्रांच्या आसपास प्राचीन ग्रंथांचा संग्रह करण्यात आला आहे. या प्राचीन ग्रंथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञानपरंपरेवर संशोधन करण्यास साहाय्य मिळणार आहे.

संपादकीय भूमिका :

प्राचीन, सर्वश्रेष्ठ, महान हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे अभ्यासक्रम सर्वच विद्यापिठांमध्ये चालू हाणे आवश्यक आहे !