काटोल (जिल्हा नागपूर) येथे शेकापचे नेते राहुल देशमुख यांना अटक !

तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी पत्रक काढल्याने वाद, काटोल कडकडीत बंद !

नागपूर – जिल्ह्यातील काटोल येथे पोलिसांनी शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक नेते राहुल देशमुख यांनी एका तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणी विशिष्ट समाजाच्या लोकांविरोधात संशय निर्माण होईल आणि सामाजिक सलोखा बिघडेल अशा आशयाचे पत्रक काढले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हे पत्रक काटोल परिसरात वितरित करण्यात आले होते. राहुल देशमुख यांच्या अटकेच्या निषेधार्थ काटोल बंद ठेवण्यात आले होते. अनुचित घटना होऊ नये; म्हणून काटोल येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी राहुल देशमुख यांनी इतर स्थानिक नेत्यांच्या समवेत मेणबत्ती मोर्चाचे आयोजनही केले होते. ‘राहुल देशमुख यांची कृती सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघडवणारी आहे’, असा ठपका ठेवत पोलिसांनी सकाळी राहुल देशमुख यांना अटक केली आहे. त्यानंतर काटोल पोलीस ठाण्याच्या समोर राहुल देशमुख यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी काटोल येथे जाऊन घटनेची माहिती घेतली. नंतर तेही आंदोलनात सहभागी झाले. देशमुख यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली.