२५.५.२०२४ या दिवशी कोपरगाव, नाशिक येथील कै. दिलीप सारंगधर यांचे दुसरे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलगी, सून आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि निधनानंतर मुलीला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभती येथे दिल्या आहेत.
१. सौ. काव्या दुसे (कै. दिलीप सारंगधर यांची मुलगी), कोल्हापूर
१ अ. गुणवैशिष्ट्ये
१ अ १. स्वावलंबी आणि व्यवस्थितपणा : ‘बाबा स्वतःची कामे नेहमी स्वतःच करत असत. ते घेतलेली वस्तू नेहमी जागेवर ठेवत असत. घरीही ते आश्रमात रहात असल्यासारखे रहात असत.
१ अ २. धर्मशास्त्रानुसार सण साजरे करणे : त्यांना सणवार धर्मशास्त्राप्रमाणेच साजरे केलेले आवडायचे. त्यामुळे घरी प्रत्येक सण धर्मशास्त्राप्रमाणेच साजरा केला जायचा.
१ अ ३. पत्नीला सर्वतोपरी साहाय्य करणे
१ अ ४. घरकामात साहाय्य करणे : ते कुठलीही लाज न बाळगता घरातील सर्व कामे करायचे, उदा. भांडी घासणे, भांडी लावणे, दूध तापवणे, लादी पुसणे इत्यादी. आई प्रचारसेवेला गेली असेल किंवा शिबिरासाठी बाहेरगावी गेली असेल आणि तिला यायला उशीर होणार असेल, तर ते स्वयंपाकही करून ठेवायचे. ही कामे करतांना त्यांचा कुठलाही पुरुषी अहंकार आडवा येत नव्हता.
१ अ ५. समष्टी सेवेत साहाय्य करणे : घरात सत्संग असतांना ते ‘सर्व साधकांसाठी चहा करणे, सर्वांना चहा-बिस्किटे देणे आणि चहाची भांडी धुणे’, या सर्व सेवा करायचे. यामुळे अप्रत्यक्षपणे आईला समष्टी सेवेत त्यांचे साहाय्य होत होते.
१ अ ६. सेवाभाव : बाबा इतरांना सनातनच्या ग्रंथांची माहिती सांगून ते ग्रंथ घेण्यासाठी उद्युक्त करायचे. अनेक जण बाबांकडून ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेत असत. बाबांमध्ये समष्टी सेवा पूर्ण मुरली होती. स्वतःची वैयक्तिक कामे बाजूला ठेवून ते धर्मकार्य करायचे. काही हिंदुत्ववाद्यांनी सांगितले, ‘‘निःस्वार्थपणे झोकून देऊन धर्मकार्य कसे करायचे’, हे आम्हाला काकांकडून शिकता आले.’’
१ अ ७. साधक आणि समाजातील ओळखीचे लोक यांना आधार वाटणे : साधक आणि समाजातील ओळखीचे लोक म्हणाले, ‘‘आम्हाला कुठलीही अडचण आली किंवा आम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल, तर ते दिलीपकाका देतील’, अशी आम्हाला निश्चिती असायची. त्यांच्याशी बोलल्यावर आम्हाला आधार मिळून हलके वाटायचे.’’
१ आ. जाणवलेले पालट
१ आ १. अंतर्मुख होणे : ‘अलीकडे बाबा पुष्कळ मोकळे आणि अंतर्मुख झाले आहेत’, असे मला जाणवत असे.
१ आ २. अखंड नामजप होणे : मागील काही मासांपासून त्यांचा नामजप अखंड होऊ लागला होता. ते वैयक्तिक काम किंवा दुकानात शिवणकाम करत असतांना नामजप लावून ठेवूनच सर्व गोष्टी करत असत. दुकानातील शिवणकामही ते ‘साधना’ म्हणून करायला लागले होते. त्यामुळे त्यांच्या शिवणकामात गती आणि परिपूर्णता आली होती. त्यामुळे त्यांचे शिवणकाम सर्वांना आवडू लागले होते.
१ आ ३. दुकानातील देवतेचे चित्राच्या रंगात निर्गुण स्तरावरील पालट होणे : दुकानात देवपूजेसाठी ठेवलेल्या देवाच्या चित्राची बाबा नियमित आणि भावपूर्ण पूजा करीत असत. त्यामुळे ‘देवतेच्या चित्रात निर्गुण स्तरावर पालट झाले आहे’, असे जाणवत आहे.
१ आ ४. आत्याआजीला वडिलांचा चेहरा तेजस्वी दिसणे : माझ्या आईची आत्या आमच्या गावापासून ५० – ६० किलोमीटर अंतरावरील एका गावात रहाते. बाबा पंचांग देण्याच्या सेवेनिमित्त तिकडे आत्याआजीला भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा तिलाही बाबांचे वेगळेपण जाणवले. बाबा तिथून निघताक्षणी तिने आईला भ्रमणभाष केला, ‘‘जावई कुठली साधना करतात ? त्यांचे तेज वाढले आहे. मला त्यांच्यात माझा देव दिसला. ते घरात आल्यावर मला घरात प्रकाश जाणवला.’’
१ आ ५. समाजातील लोकांनाही वडिलांचा चेहरा तेजस्वी आणि आनंदी दिसणे : समाजातील काहींनी सांगितले, ‘‘काका कपाळावर कुंकवाचे नाम लावायचे. आम्हाला त्यात शक्ती जाणवून त्यातून ऊर्जा मिळायची. अलीकडे काका पुष्कळ तेजस्वी आणि आनंदी दिसत होते.’’
अलीकडे बाबांच्या चेहर्यात बराच पालट होऊन त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत असे. बाबांमधील हे पालट माझी ‘आई (निर्मला), भाऊ (प्रसाद), जिल्ह्यातील साधक आणि समाजातील लोक यांनाही जाणवत असत.
१ इ. निधनानंतर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
१ इ १. वडिलांचे निधन झालेले असूनही कुटुंबियांना घरात गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे : २७.३.२०२४ या दिवशी बाबांचे निधन झाल्यानंतर दुसर्या दिवशी आम्ही त्यांचे मृत्यूत्तर विधी करून घरात आल्यानंतर घरात पुष्कळ शांत वाटत होते. ‘घरात काही वाईट घडले आहे’, असे वाटतच नव्हते. आम्हा सर्वांना घरामध्ये गुरुदेवांचे अस्तित्वही जाणवत होते.
१ इ २. दहाव्या दिवशी कावळ्याने पाचही पिंडांना स्पर्श करून त्या पिंडाना प्रदक्षिणा घालणे : दहाव्या दिवशीचा पूर्ण विधी संपेपर्यंत एक कावळा झाडाच्या फांदीवर बसून राहिला होता. आलेल्या सर्व पाहुण्यांनी पिंडाचे दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त करताक्षणी क्षणाचाही विलंब न करता त्या कावळ्याने पाचही पिंडांना स्पर्श केला आणि ‘जणू एखाद्या उन्नत व्यक्तीने प्रदक्षिणा घालावी’, अशा पद्धतीने पाचही पिंडांना प्रदक्षिणा घातली. हे दृश्य जवळजवळ आमचे २०० ते २५० नातेवाईक पहात होते. हे दृश्य बघून त्यांना पुष्कळ आश्चर्य वाटले. बर्याच जणांनी सांगितले, ‘बाबांचा जीव कशातच अडकला नाही. ते अगदी तृप्त आहेत.’
१ इ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटून भावजागृती होणे : वरील दृश्य पाहिल्यानंतर मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘बाबा कुठल्याही गोष्टीत अडकले नाहीत’, याची मला निश्चिती वाटली. ‘बाबांच्या जीवनाचे सार्थक झाले. गुरुदेव किती दयाळू आहेत. ते साधकांची किती काळजी घेतात. ‘ते सर्व साधकांना असेच पुढे नेणार आहेत’, असे वाटून माझी भावजागृती झाली.
१ इ ४. ‘कावळ्याने पिंडांना स्पर्श करून प्रदक्षिणा घालणे’, हे मी पहिल्यांदा पाहिले’, असे ३५ वर्षे स्मशानभूमीत विधी करणार्या व्यक्तीने सांगणे : कावळ्याने सगळ्या पिंडांना स्पर्श करून त्या सर्व पिंडांना प्रदक्षिणा घातली, तेव्हा स्मशानभूमीमध्ये असलेली एक वृद्ध व्यक्ती म्हणाली, ‘‘मी मागील ३५ वर्षे स्मशानभूमीत लोकांचे विधी करत आहे; पण अशा पद्धतीचे कावळ्याने स्पर्श करणे आणि प्रदक्षिणा घालणे’, हे मी प्रथमच पाहिले. हा जीव एकदम तृप्त होता.’’ अशाच पद्धतीच्या अनेक प्रतिक्रिया नातेवाईक आणि समाजातील लोकांनीही दिल्या.
१ ई. निधनानंतर नातेवाईक आणि समाजातील लोकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया
१ ई १. घरातील व्यक्तीचे निधन झाल्यावर इतर ठिकाणांप्रमाणे भीती न वाटता चांगले वाटणे : आमच्या घरी कपडे इस्त्री करण्यासाठी एक धोबी महिला येते. घरात येताक्षणी ती म्हणाली, ‘‘मला वाटले, ‘काका गेल्यानंतर येथे पुष्कळ भीतीचे वातावरण असेल. बहुतेक ठिकाणी घरातील व्यक्तीचे निधन झाल्यावर त्या घरात गेल्यावर पुष्कळ भीती वाटते. मी माझ्या घरातही तसे अनुभवले आहे’; म्हणून मी बरेच दिवस तुमच्याकडे आले नाही; पण येथे आल्यानंतर मला चांगले वाटत आहे. काका सतत नामजप करायचे, त्यामुळे चांगले वाटत आहे.’’
१ ई २. उपहारगृहातील कामगारांनाही घरी चांगले वाटणे : आमच्या काकांचे आणि आमच्या घराच्या बाजूला असणारे उपहारगृह येथील कामगार घरी भेटायला आल्यानंतर म्हणाले, ‘‘एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या घरी जाऊ नये’, असे वाटते किंवा तिथे गेल्यावर डोके दुखते; पण इथे चांगले वाटत आहे.’’ अशा प्रतिक्रिया ‘ज्यांना साधना ठाऊक नाही’, अशा अनेक व्यक्तींनी व्यक्त केल्या. बाबांच्या निधनांनतर एका मासामध्ये समाजातील २ सहस्र ५०० हून अधिक लोक घरी भेटायला येऊन गेले आणि त्या सर्वांनी बाबांचे मनापासून कौतुक केले.
‘मला बाबांमधील अनेक गुण शिकायला मिळाले’, यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
२. सौ. मानसी समीर सारंगधर (कै. दिलीप सारंगधर यांच्या मोठ्या भावाची सून), कोपरगाव
२ अ. नात्याने सासरे असूनही मुलीप्रमाणे वागवणे : ‘कै. दिलीप सारंगधर हे नात्याने माझे सासरे होते; पण त्यांनी मला सूनेप्रमाणे न वागवता मुलीप्रमाणेच वागवले. ते नेहमी वडील म्हणूनच माझ्याशी बोलायचे आणि वागायचे. मी गरोदर असतांना त्यांनी माझ्याकडून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार सर्व उपाय आणि ग्रंथवाचनही करून घेतले.’
३. सौ. स्नेहल शेरीकर (साधिका), नाशिक
अ. ‘कै. दिलीपकाका सतत आनंदी असायचे.
आ. ‘त्यांना कुठलीही सेवा सांगितली की, ती होणारच’, अशी आम्हाला निश्चिती असायची. त्यामुळे आम्हाला त्यांचा पुष्कळ आधार वाटायचा.’
४. सौ. वनिता आव्हाड , कोपरगाव
अ. ‘दिलीपकाकांच्या निधनामुळे ‘एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ गेला’, अशी समाजातील लोकांना फार हळहळ वाटली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक (१५.५.२०२४))
|