प्रेमळ आणि कुटुंबियांचा आध्यात्मिक आधारस्तंभ असलेले ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) बाळासाहेब विभूते (वय ६९ वर्षे)!

१४.५.२०२४ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे बाळासाहेब विभूते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६९ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणाच्या कालावधीत, निधनाच्या वेळी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. बाळासाहेब विभूते

१. सौ. रोहिणी राजमाने ((कै.) बाळासाहेब विभूते यांची मुलगी), सातारा

सौ. रोहिणी राजमाने

१ अ. आजारी असतांनाही मुलीशी मायेविषयी न बोलता साधनेविषयीच बोलणे : ‘बाबांचे शस्त्रकर्म ठरल्यावर मी त्यांना प्रतिदिन रात्री भ्रमणभाष करायचे. त्या स्थितीतही बाबा मला म्हणत, ‘‘संसारात राहून साधना कर. नामजपादी उपाय कर आणि गुरुदेवांना आत्मनिवेदन करत रहा. गुरुदेव जन्मोजन्मी आपल्या समवेत आहेत.’’ बाबा कधीच ‘साधना’ हा विषय सोडून मायेतील बोलत नसत.

१ आ. बाबांकडे पाहून प.पू. रामानंद महाराज यांची आठवण येणे : १२.५.२०२४ या दिवशी बाबांची आणि माझी शेवटची भेट झाली. त्या दिवशी बाबा पुष्कळ स्थिर होते. त्यांच्या चेहर्‍याकडे पाहून मला प.पू. रामानंद महाराज यांची आठवण झाली. त्यांचा चेहरा पुष्कळ सात्त्विक वाटत होता.

१ इ. त्यांनी माझ्या चेहर्‍यावरून हात फिरवला आणि म्हणाले, ‘‘विभूते परिवारातील प्रत्येक व्यक्तीने १ कोटी नामजप करा !’’

२. सौ. जान्हवी अभिजित विभूते ((कै.) बाळासाहेब विभूते यांची मोठी सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ अ. गुणवैशिष्ट्ये

सौ. जान्हवी विभूते

२ अ १. ‘शारीरिक दुखण्यामुळे बाबांना कधी कधी सेवा करतांना दम लागत असे. त्या वेळी त्यांना ‘मला देवाची सेवा करता येत नाही’, याची पुष्कळ खंत वाटत असे.

२ अ २. नातेवाईक आणि मित्र यांना साधना सांगण्याची तळमळ : ते देवद आश्रमातून कुर्ली (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) येथे त्यांच्या गावी गेले की, सर्व नातेवाइकांना साधना करण्याविषयी सांगत असत. ते देवद आश्रमात असतांना त्यांचे मित्र त्यांना भेटायला आल्यास ‘मित्रांना आश्रमातील चैतन्याचा लाभ कसा होईल ?’, याचा ते विचार करत असत आणि त्यासाठी त्यांची धडपड असे.

२ अ ३. मुलगा आणि सून यांना साधनेत साहाय्य करून प्रोत्साहन देणे : आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पैसा, मान आणि संपत्ती यांना महत्त्व आहे. त्यामुळे ‘आपला मुलगा आणि सून यांना ‘साधना करा’, असे सांगणारे आणि त्यांच्याकडून साधना करवून घेणारे पालक अत्यल्प असतात. बरेच पालक मुलांना मायेत अडकवतात; पण बाबा आम्हाला साधना करण्यासाठी साहाय्य करत असत. ‘कितीही अडचण आली, तरी गुरूंचे चरण सोडू नका. ‘जशी पाण्याविना मासोळी, तसे गुरुविना आपण’, अशी स्वतःची स्थिती निर्माण करा’, असे ते आम्हाला सतत सांगत असत.

२ अ ४. चूक झाल्यावर मुलाची क्षमा मागणे आणि चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणे : एकदा एका प्रसंगात बाबा माझ्या यजमानांशी (श्री. अभिजित यांच्याशी) रागाने बोलले. तेव्हा बाबांना त्याची जाणीव झाली आणि त्यांनी लगेच माझ्या यजमानांची (त्यांच्या मुलाची) क्षमा मागितली. त्यांनी ‘माझी अशी चूक झाली आहे, तर मी काय प्रयत्न करू ?’, असे मुलाला विचारले. स्वतःच्या स्वभावदोषांविषयी विचारून त्यांवर त्यांनी मुलाकडून स्वयंसूचना बनवून घेतल्या आणि त्यांची नियमितपणे सत्रे केली.

२ अ ५. त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, तरीही ‘देव आणि गुरुच सर्व चांगले करणार आहेत’, अशी त्यांची श्रद्धा होती.

एका संतांनी (कै.) बाळासाहेब विभूते यांचे केलेले कौतुक !

१. ‘१३.५.२०२२ या दिवशी आमच्या कुटुंबाला एका संतांचा सत्संग लाभला. तेव्हा संतांनी ‘तुम्ही मुलांवर किती छान संस्कार केलेत !’, असे म्हणून बाबांचे पुष्कळ कौतुक केले होते.

२. सत्संगात बाबा बोलत असतांना संतांनी त्यांना थांबवले आणि सत्संगात उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांना विचारले, ‘‘विभूतेकाका बोलत असतांना काही अनुभूती आली का ?’’ तेव्हा आम्हाला ‘सुगंध येणे, थंडावा जाणवणे, नामजप चालू होणे, शांती जाणवणे’, अशा विविध अनुभूती आल्या. तेव्हा संत बाबांना म्हणाले, ‘‘बघा, तुम्ही बोलत असतांना इतरांना किती अनुभूती येतात ! तुम्हाला हे ठाऊक होते का ?’’ तेव्हा बाबांचा कृतज्ञताभाव जागृत झाला.’

– सौ. जान्हवी अभिजित विभूते ((कै.) बाळासाहेब विभूते यांची मोठी सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२४)

२ आ. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे

१. बाबांनी त्यांच्या शस्त्रकर्मापूर्वी २ दिवस त्यांच्या बहीण-भावंडांची पूर्वी झालेल्या चुकांविषयी क्षमायाचना केली.

२. ज्या दिवशी बाबांचे शस्त्रकर्म होते, त्या दिवशीची त्यांची छायाचित्रे पाहिल्यावर त्यांची दृष्टी पुष्कळ शांत वाटत होती.

२ इ. ‘निधनाच्या वेळी ते गुरूंचा पुष्कळ धावा करत होते’, असे मला जाणवले.

२ ई. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१. बाबांकडे पाहिल्यावर ‘त्यांचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे मला जाणवत होते.

२. त्यांचा चेहरा पुष्कळ तेजस्वी दिसत होता. त्यांच्या देहाभोवती पिवळे वलय दिसत होते.

३. ‘घरात कोणी मृत झाले आहे’, असे वाटत नव्हते. बाबांची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के असल्याने तेथे चांगली स्पदने जाणवत होती.’

३. सौ. गौरी उमाकांत विभूते ((कै.) बाळासाहेब विभूते यांची धाकटी सून), बेळगाव

३ अ. गुणवैशिष्ट्ये

३ अ १. प्रेमभाव : ‘मला माझ्या सासर्‍यांचा (बाबांचा) सहवास ३ वर्षे लाभला. मी त्यांची सून असूनही त्यांनी मला मुलीप्रमाणे प्रेम दिले. बाबांचे प्रेम अत्यंत निरागस होते.

३ अ २. सासर्‍यांचे साधनेविषयीचे बोलणे ऐकून भावजागृती होणे : मी जेव्हा बाबांशी भ्रमणभाषवर बोलत असे, तेव्हा ते मला साधना चालू ठेवून आनंदी रहाण्यास सांगायचे. ते ‘कोणत्याही प्रसंगात देव आपल्या पाठीशी कसा आहे ? तो आपली कशी काळजी घेतो ?’, हेच तळमळीने सांगायचे. त्यांचे बोलणे ऐकून माझी भावजागृती होत असे.

३ अ ३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणे ते आमचे श्रद्धास्थान होते.

३ अ ४. बाबा आश्रमातून घरी आल्यावर प्रत्येक कृती साधना म्हणून करत असत.

३ अ ५. त्यांच्याशी बोलतांना ‘त्यांच्याकडून चैतन्य मिळत आहे आणि आमच्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत आहेत’, असे मला जाणवत असे.

३ आ. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे

३ आ १. शस्त्रकर्मासाठी रुग्णालयात भरती केल्यावर देवावर श्रद्धा ठेवून स्थिर रहाणे : बाबा २० दिवस रुग्णालयात होते. आरंभी त्यांना शस्त्रकर्म करून घेण्यास भीती वाटत होती. मी आणि माझे यजमान (श्री. उमाकांत विभूते) यांनी बाबांकडून प्रसंगाचा सराव करून घेतला. तेव्हा त्यांनी आमचे कौतुक केले. नंतर ते म्हणायचे, ‘‘देवाने माझा हात धरला आहे.’’ त्यांची देवावर दृढ श्रद्धा आणि भक्ती होती. त्यांच्या मनात कोणतीच काळजी आणि भीती नव्हती. ते स्थिर होते.

३ आ २. शेवटपर्यंत स्थिर आणि आनंदी रहाणे अन् कुटुंबियांकडून साधना करवून घेणे : बाबांचे शस्त्रकर्म होण्याच्या २ दिवस आधी आम्ही बाबांना भेटलो. तेव्हा त्यांनी आमची प्रेमाने विचारपूस केली. ते मला प्रेमाने ‘श्रीराम’ म्हणायचे. शस्त्रकर्म होण्यापूर्वी एक घंटा मी बाबांशी बोलले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘माझा श्रीराम कुठे आहे ?’’ तेव्हा माझी भावजागृती झाली. त्यांनी आम्हाला त्यांच्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेला नामजप करण्यास सांगितले. त्या माध्यमातून त्यांनी शेवटपर्यंत आमच्याकडून साधना करवून घेतली. शस्त्रकर्मगृहात नेण्यापूर्वीही ते पुष्कळ स्थिर आणि आनंदी होते.

३ इ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१. आम्ही बाबांचे पार्थिव घेऊन पनवेलहून गावी जाण्यासाठी निघालो. तेव्हा प्रवासामध्ये कुठेच अडथळे आले नाहीत. ‘देव क्षणोक्षणी आमच्या पाठीशी आहे’, असे मला जाणवत होते.

२. बाबांच्या रक्षेमधून सुगंध येत होता, तसेच ‘त्यांतून चैतन्याची स्पंदने येत आहेत’, असे मला जाणवले. माझा आपोआपच ‘निर्विचार’, हा नामजप चालू झाला.

३. घरात हलकेपणा जाणवत होता.

४. आम्ही कुटुंबीय नामजप आणि आत्मनिवेदन करत होतो. तेव्हा आमची भावजागृती होत होती.

‘प.पू. गुरुमाऊली, हे श्रीमन्नारायणा, तुझ्या कृपाशीर्वादानेच मला असे सासरे लाभले, तसेच त्यांचा सहवास मिळाला. ‘बाबांविषयीचे हे लिखाण तूच माझ्याकडून करवून घेतलेस’, याबद्दल मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. हे गुरुमाऊली, ‘बाबांना लवकरात लवकर संतपद प्राप्त होऊ दे. त्यांच्यातील गुण आम्हाला आत्मसात करता येऊ दे. बाबांची शिकवण आम्हाला आचरणात आणता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

४. कु. आर्यन राजमाने ((कै.) बाळासाहेब विभूते यांचा नातू (मुलीचा मुलगा), वय १६ वर्षे), सातारा

कु. आर्यन राजमाने

४ अ. प्रेमभाव : ‘सुटीमध्ये आजोबांकडे जायचे’, असे आईने सांगितल्यावर माझा आनंद गगनात मावत नसे. आजोबा मला मिठीत घेऊन माझ्या गालावरून हात फिरवत असत. ते माझे कौतुकही करायचे. माझे नाव आर्यन आहे; पण आजोबा मला प्रेमाने ‘हनुमान’ म्हणत असत. त्यांनी ‘हनुमान’ म्हणून हाक मारल्यावर मला गहिवरून येत असे. आजोबा आमच्या कुटुंबियांसाठी राम होते. त्यामुळे त्यांनी मला कितीही कष्टाचे काम सांगितले, तरी मी हनुमानाप्रमाणे ते पूर्ण करत असे. माझ्या वाढदिवसाला प्रथम आजोबाच मला भ्रमणभाष करून शुभेच्छा द्यायचे. आजोबांविषयीचे प्रेमळ प्रसंग आठवले की, माझ्या मनाला पुष्कळ शांत वाटते.

४ आ. आजोबा माझ्यासाठी केवळ आजोबा नव्हते, तर ते आमच्या कुटुंबियांचा आधार आणि मार्गदर्शक होते.

४ इ. चुकांची जाणीव करून देऊन त्याविषयी उत्तम मार्गदर्शन करणे : आजोबांच्या सहवासात असतांना माझ्याकडून पुष्कळ चुका झाल्या. तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी मला माझ्या चुकांची जाणीव करून दिली आणि ‘कसे वागावे ? कसे बोलावे ? कसे उत्तर द्यावे ?’, यांविषयी उत्तम मार्गदर्शन केले.

४ ई. स्वतः सतत नामजप करणे आणि कुटुंबियांना नामजपाची गोडी लावणे : आजोबा सतत नामजप करायचे. त्यांनी कुटुंबियांना नामजप आणि प्रार्थना यांचे महत्त्व सांगितले अन् सर्वांना नामजपाची गोडी लावली. त्यांच्या समवेत नामजप केल्यावर आम्हाला उत्साह, चैतन्य आणि आनंद मिळत असे.

आजोबांनी दिलेली शिकवण आणि संस्कार आम्ही कधीच विसरणार नाही. आम्ही त्यांचा आदर्श सदैव आमच्या डोळ्यांसमोर ठेवू आणि तसे वागण्याचा प्रयत्न करू.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २२.५.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक