प्रेमळ आणि देवाप्रती भाव असलेल्या अपशिंगे (जिल्हा सातारा) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) खाशीबाई नारायण निकम !

‘१५.५.२०२४ या दिवशी सद्गुरु (कै.) नारायण (तात्या) निकम यांच्या पत्नी श्रीमती खाशीबाई नारायण निकम (वय ८८ वर्षे) यांचे निधन झाले. २५.५.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. (श्रीमती) खाशीबाई नारायण निकम

१. श्री. बाळकृष्ण नारायण निकम (श्रीमती खाशीबाई यांचा मुलगा) आणि श्री. मंगेश निकम (श्रीमती खाशीबाई यांचा पुतण्या), अपशिंगे, जिल्हा सातारा. 

१ अ. प्रेमभाव : ‘आई (श्रीमती खाशीबाई निकम) केवळ नातेवाईक आणि साधक यांचीच नाही, तर समाजातील व्यक्तींचीही काळजी घेत असत. आई सगळ्यांचा प्रेमाने पाहुणचार करत असत. त्या घरी आलेल्या व्यक्तीला काहीतरी खायला देऊनच पाठवत असत. आम्हाला अनेक जणांनी त्यांचा पाहुणचार अनुभवल्याचे सांगितले.

१ आ. देवासाठी त्याग करण्याची वृत्ती : समाजातील व्यक्तींना ‘स्वरक्षण कसे करायचे’, याचे प्रशिक्षण देण्यासाठी विनामूल्य जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न चालू होते. वर्ष २०००-२००१ मध्ये आम्ही आसपासच्या गावांमध्ये अशी जागा मिळण्यासाठी प्रयत्न करत होतो; पण आम्हाला जागा मिळाली नाही. हा विषय आईंना समजल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुम्ही अन्यत्र जागा शोधण्यापेक्षा आपली स्वतःची जागा देवाच्या कार्यासाठी वापरा.’’ नंतर त्या जागेत स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू झाला.

१ इ. आईंची आध्यात्मिक पातळी घोषित होणे : आईची आंतरिक साधना असल्यामुळे वर्ष २०१७ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांची साधना चांगली चालू होती.

१ ई. कर्तेपणा न घेणे : ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका झाला आणि त्यांच्या शरिराची डावी बाजू कमकुवत झाली. त्या दीड वर्ष अंथरुणावर होत्या. घरातील अन्य व्यक्तींना आईंचे करावे लागत असल्याने त्यांच्या मनात ‘हा देह नको. मला मृत्यू आला असता, तर बरे झाले असते’, असे नकारात्मक विचार येत होते. तेव्हा मी (श्री. बाळकृष्ण) आईला सांगत असे, ‘‘तू आतापर्यंत दुसर्‍यांना पुष्कळ साहाय्य केले आहेस. आमच्या कल्याणासाठी आवश्यक असल्यामुळे तुझी सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. तू आम्हाला लहानाचे मोठे केले आहेस.’’ तेव्हा आई मला सांगत असे, ‘‘ते माझे (आईचे) कर्तव्य आहे.’’

१ उ. प.पू. डॉ. आठवले यांच्या प्रती भाव : १३.५.२०२४ या दिवशी आईंना वेदना होत होत्या. त्यांना वेदनाशामक औषधे देऊनही आराम पडत नव्हता. त्या सतत प.पू. डॉक्टरांच्या नावाचा जप करत होत्या. त्या प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून सतत सांगत होत्या, ‘आता मला यातून सोडवा.’ १४.५.२०२४ या दिवशी आईंचे बोलणे बंद झाले. त्यांनी डोळे उघडले नाहीत. त्यांच्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय सांगितले. तेव्हा आईंना आराम पडला होता. १५.५.२०२४ या दिवशी पहाटे आईंचे निधन झाले.’

२. सौ. शिल्पा संताजी निकम (कै. (श्रीमती) खाशीबाई यांची धाकटी सून), अपशिंगे, जिल्हा सातारा.

२ अ. आईंना ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे दर्शन होणे : ‘सद्गुरु निकमतात्या यांच्याप्रमाणे आईंना ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे दर्शन झाले होते. त्यांना अर्धांगवायूचा त्रास होण्यापूर्वी त्या प्रतिदिन ग्रामदेवतेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जात असत. एक दिवस त्या मंदिरात अभिषेक चालू असतांना आईंना ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे खांद्यावर घोंगडे, डोक्याला फेटा आणि हातात काठी, अशा वेशात दर्शन झाले. नंतर आईंना काही वेळाने ‘देव अदृश्य झाला’, असे दिसले.’ (लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २०.५.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक