‘मुलांनी मायेत न अडकता साधना करावी’, या तळमळीने त्यांना साधनेत साहाय्य करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) बाळासाहेब विभूते (वय ६९ वर्षे) !  

१४.५.२०२४ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे बाळासाहेब विभूते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६९ वर्षे) यांचे निधन झाले. २४.५.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा ११ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. अभिजीत विभूते यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणाच्या कालावधीत, निधनाच्या वेळी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कै. बाळासाहेब विभूते

१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

अ. ‘बाबा भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करायचे.

आ. आम्हा मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी बाबांनी सर्व प्रकारचे साहाय्य केले.

इ. ‘मुलांनी पैसा आणि माया यांमध्ये न अडकता साधना करावी’,  असे त्यांना वाटायचे.

ई. आम्ही मनाने खचलो, तर ते आम्हाला सांगायचे, ‘‘गुरुदेवांचे स्मरण करा. सतत भावस्थितीत रहा. गुरुदेवांनी आपला हात धरला आहे, तर कसलीच काळजी करू नका. गुरुदेवांचे मन जिंका.’’ ते ‘त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत ना ?’, याचा आढावाही घ्यायचे.

उ. बाबांना तीव्र शारीरिक वेदना होत असतांनाही त्यांच्या चेहर्‍यावर नेहमी स्मितहास्य असायचे.

ऊ. आईला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होत असतांना बाबांनी तिची मनोभावे सेवा केली.

श्री. अभिजीत विभूते

२. शेवटचे आजारपण

२ अ. दम लागण्याचे प्रमाण वाढणे आणि आधुनिक वैद्यांनी हृदयाचे शस्त्रकर्म करायला सांगणे : बाबांना वर्ष २०१५ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्या वेळी त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत ब्लॉकेजेस (अडथळे) आढळले होते. फेब्रुवारी २०२४ पासून त्यांना दम लागण्याचे प्रमाण वाढले. एप्रिल २०२४ मध्ये आधुनिक वैद्यांनी त्यांना ‘ओपन हार्ट सर्जरी’ (हृदयाचे शस्त्रकर्म) करायला हवी’, असे सांगितले.

२ आ. मुलाला कोणत्याही स्थितीत गुरूंची शिकवण आचरणात आणण्यास शिकवणे : २२.४.२०२४ पासून बाबा २० दिवस रुग्णालयात होते. रुग्णालयामधील काही चुका पाहून मी आधुनिक वैद्यांवर चिडलो. ते पाहून बाबा मला म्हणाले, ‘‘आपण सनातनचे साधक आहोत. त्यांची क्षमा माग.’’ त्याप्रमाणे मी आधुनिक वैद्यांची क्षमा मागितली. तेव्हा बाबांनी माझे कौतुक केले आणि म्हणाले, ‘‘समोरचा कितीही चुकीचा वागत असला, तरी आपण आपल्या गुरूंची शिकवण सोडायची नाही.’’

२ इ. वडिलांची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

१. मी आणि माझ्या बहिणीने ‘प.पू. गुरुदेवांची सेवा करत आहोत’, असा भाव ठेवून त्यांची सेवा केली. त्यामुळे त्यांना अंघोळ घालतांना मला त्यांच्या शरिराचा सुगंध येत होता.

२. ‘बाबांकडून चैतन्य मिळत आहे’, असे मला वाटत असे.

३. शस्त्रकर्माला जाण्यापूर्वी बाबा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘महाशून्य’ हा नामजप  भावपूर्ण करत होते. ते पाहून माझा भाव जागृत होत होता.

२ ई. आधुनिक वैद्यांनी ‘आता सर्व देवाच्या हातात आहे’, असे सांगणे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भ्रमणभाष केल्यावर त्यांचा आधार वाटणे : १४.५.२०२४ या दिवशी दुपारी ४ वाजता शस्त्रकर्म पूर्ण झाल्यावर आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘शस्त्रकर्म झाले आहे. बाकीचे देवाच्या हातात आहे.’’ ‘शस्त्रकर्म झाल्यावर बाबा काहीच प्रतिसाद देत नव्हते’, हे आम्हाला स्वीकारता येत नव्हते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आल्यावर त्यांच्या चैतन्यमय वाणीने मला मोठा आधार मिळाला. ‘आपल्याला परिस्थिती स्वीकारावी लागेल’, असे त्यांनी मला सांगितले. तेव्हापासून माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते; परंतु माझा नामजपही चालू होता, तसेच मला माझ्या कुटुंबियांना आधार देण्याची शक्ती मिळत होती. आई या प्रसंगात स्थिर राहून आम्हाला आधार देत होती. सद्गुरूंच्या वाणीमध्ये चैतन्य एवढे असते की, ते चैतन्य आपल्या आभाळाएवढ्या दुःखातही आपल्याला आधार देते.

३. निधन : १४.५.२०२४ या दिवशी रात्री ९.१० वाजता बाबांचे निधन झाले.

४. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

४ अ. बाबांच्या निधनानंतर संत आणि साधक यांचा आम्हाला एवढा आधार वाटला की, ‘प्रत्यक्ष गुरुदेव आम्हाला या कठीण प्रसंगात आधार देत आहेत’, असे मला जाणवले.

४ आ. वडिलांचे पार्थिव गावाला नेत असतांना कुणालाही भीती किंवा त्रास न जाणवता चैतन्याची अनुभूती येणे : आम्ही रात्री पनवेलहून बाबांचे पार्थिव घेऊन कुर्ली (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) येथे जाणार होतो; म्हणून पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार (सनातनच्या २९ व्या संत, वय ३४ वर्षे) यांनी आमच्या समवेत काही साधक पाठवले. रुग्णवाहिकेमध्ये आमच्या समवेत जे साधक होते, ते बाबांच्या पार्थिवाशेजारी बिनधास्त झोपले. मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला भीती वाटली नाही का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘सनातन परिवारातील आमचे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे काका आहेत.’’ मीही बाबांच्या पार्थिवाशेजारी बसून होतो. त्या वेळी माझ्या डोळ्यांत अश्रू होते; पण माझा नामजप चालू होता. आम्हाला बाबांकडून चैतन्य मिळत होते. त्यांच्या पार्थिवाशेजारी बसल्यावरही आम्हाला पुष्कळ आधार वाटत होता. त्यांच्या समवेतच्या या १० घंट्यांच्या प्रवासात आम्हाला (माझा भाऊ, भाचा आणि साधक यांना) कोणताही त्रास जाणवला नाही.

४ इ. बाबांना घरी आणल्यावर त्यांचा चेहरा सात्त्विक दिसत होता. ‘ते ध्यानावस्थेत आहेत’, असे मला वाटत होते.

४ ई. त्यांच्याकडून आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी प्रक्षेपित होत होत्या.

४ उ. लिंगायत असूनही मृत्यूनंतरचे सर्व विधी हिंदु धर्माप्रमाणे करण्याविषयी वडिलांनी मृत्यूपत्रात लिहिलेले असल्याने त्याप्रमाणे करणे : आम्ही लिंगायत असल्याने आमच्यामध्ये मृत्यूनंतर दफन करण्याची पद्धत आहे; मात्र बाबांना सनातनमुळे हिंदु धर्मातील अग्नीसंस्काराचे महत्त्व पटले होते; म्हणून त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात ‘माझ्या मृत्यूनंतर माझे अग्नीसंस्कार करावेत आणि हिंदु धर्माप्रमाणे पुढील सर्व विधी करावेत’, असे लिहिले असल्याने आम्ही त्यांचा अग्नीसंस्कार केला.

४ ऊ. लिंगायत समाजाने वडिलांच्या अग्नीसंस्काराला विरोध न करता त्यासाठी साहाय्य करणे : बाबांच्या अग्नीसंस्कार विधीला लिंगायत समाजाचा विरोध झाला नाही. उलट या समाजानेच बाबांच्या अग्नीसंस्कार विधीची सिद्धता केली होती. ही गुरुदेवांनी दिलेली मोठी अनुभूती आहे. गुरुदेवांच्या कृपेमुळे सगळे विधी निर्विघ्नपणे पार पडले.

४ ए. नातेवाईक आणि गावकरी भजने म्हणत अन् नामजप करत अंत्ययात्रेत सहभागी झाल्याने अंत्ययात्रेला नामदिंडीचे स्वरूप येणे : १५.५.२०२४ या दिवशी बाबांचा अंत्यसंस्कार झाला. त्या वेळी दत्ताची भजने म्हणत, टाळ आणि ढोलकी वाजवत, तसेच नामजप करत सर्व नातेवाईक अन् समाजातील लोक २ कि.मी. अंतरापर्यंतच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यामुळे ‘बाबांच्या अंत्ययात्रेला नामदिंडीचे स्वरूप आले’, असे मला जाणवले. तेव्हा दुपारची वेळ होती, तरीही थंडावा जाणवत होता.

४ ऐ. अस्थीसंचयनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

४ ऐ १. बाबांच्या अस्थी गोळा करत असतांना मला त्यांतून ‘महाशून्य’ हा जप ऐकू येत होता.

४ ऐ २. अस्थींतून ‘माझी काळजी न करता साधना करा’, अशा आशयाचे वडिलांचे बोलणे ऐकू येणे : त्या वेळी मला अस्थींतून बाबांचे पुढील बोलणे ऐकू आले, ‘मला हिंदु राष्ट्रात सेवा करायची होती; परंतु हा देह थकला होता. आता मला साधना करण्यासाठी या थकलेल्या देहाची अडचण येत नाही. मी पुढील साधनाप्रवास चालू केला आहे. तुम्ही माझी काळजी करू नका. माझ्या या देहात न अडकता तुम्ही जोमाने व्यष्टी आणि समष्टी साधना करा. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमधून मुक्त व्हा. मी गुरुदेवांच्या सूक्ष्म रूपाच्या समवेत आहे. ते मला साधनेत पुढे घेऊन जात आहेत. येथे मला सनातनच्या देहत्याग केलेल्या सर्व संतांचा सत्संग लाभला आहे.’

५. ‘गुरुदेव साधकांच्या मृत्यूनंतरही त्यांची काळजी घेणार आहेत’, याविषयी आश्वस्त करणारी साधकाला आलेली अनुभूती ! : १७.५.२०२४ या दिवशी आम्ही कुटुंबीय नामजप करत बसलो होतो. तेव्हा मला आणि माझा भाचा कु. आर्यन राजमाने यांना सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘बाबांचा सूक्ष्मदेह पुढील साधनेसाठी जात आहे. तेथे देहत्याग केलेले सनातनचे संत आणि साधक त्यांच्या स्वागतासाठी फुले घेऊन उभे आहेत.’

या अनुभूतीवरून मला जाणवले, ‘देहत्याग केलेल्या सनातनच्या साधकांसाठी गुरुदेवांनी सूक्ष्मातून आश्रम बांधून ठेवले आहेत. तेथेही सूक्ष्म स्तरावर सेवा आणि साधना चालू आहे. स्वतः गुरुदेव त्यांचा सत्संग घेऊन त्यांना साधनेत पुढे पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे सनातनच्या साधकांनी ‘मृत्यू झाल्यानंतर आपले काय होईल ?’, याची चिंता करण्याची आवश्यकता नाही.’

– श्री. अभिजित विभूते ((कै.) बाळासाहेब विभूते यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२४)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक