२२ व्या वर्षी देशात २५५ वा क्रमांक मिळवून यू.पी.एस्.सी. परीक्षेत मिळवले यश !
चिपळूण – भ्रमणभाषचा सदुपयोग करता येऊ शकतो. यू.पी.एस्.सी.च्या प्रवासात भ्रमणभाष माझा गुरु बनला. प्रारंभी भ्रमणभाषवरून मूलभत माहिती मिळवली. ‘यू ट्यूब’वर माहितीचे असंख्य स्रोत उपलब्ध आहेत. त्याचाही लाभ झाला. त्यामुळे भ्रमणभाषचा असाही चांगल्या तर्हेने उपयोग करून घेता येतो, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसाठी इंटरनेट आणि भ्रमणभाषचा सदुपयोग करावा, असे आवाहन तालुक्यातील कळकवणे येथील समर्थ अविनाश शिंदे यांनी केले. त्यांनी २२ व्या वर्षी देशात २५५ वा क्रमांक मिळवून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (पी.एस्.सी.च्या) परीक्षेत यश मिळवले. अमित गॅस एजन्सीचे संचालक अविनाश शिंदे आणि कोचिंग क्लासेस घेणार्या मेहाताई शिंदे यांचे ते सुपुत्र होत.
समर्थ अविनाश शिंदे पुढे म्हणाले की,
१. लहानपणापासूनच यू.पी.एस्.सी. करण्याचे स्वप्न होते. त्याला कारणीभूतही चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी आहेत. त्या वेळी इंटरनेट नव्हते. त्यामुळे ‘सीडी’ आणून त्यांची व्याख्याने आम्ही ऐकत होतो आणि तेव्हापासून मग आय.ए.एस् अधिकारी कसे असतात ? ते बनण्यासाठी काय कराये लागते ? याचा शोध चालू झाला. आपल्याला असे अधिकारी व्हायचे, असे मनात ठरवले आणि त्या दृष्टीने अभ्यास चालू केला. वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे अनेक माणसे लहानपणापासून भेटत गेली. त्यामुळे पुष्कळ गोष्टी लहानपणी शिकायला मिळाल्या आणि त्यातूनच व्यक्तीमत्त्वाची जडणघडण होत गेली.
२. कोरोनाच्या काळात दळणवळण बंदीच्या वेळ २ वर्षे घरीच असल्यामुळे त्या काळात पुष्कळ अभ्यास झाला.
३. आता मी पुण्यात चाणक्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवतो. कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागृती आहे; मात्र या ठिकाणी एम्.आय.डी.सी. आणि अन्य माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. कोकणी माणूस समाधानी आहे. त्यामुळे तो स्पर्धा परीक्षांतून यश मिळवण्यासाठी धडपड करतांना दिसत नाही.
४. मुंबई किंवा पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी, त्या दृष्टीने असणारे वातावरण अनुभवण्यासाठी तेथे रहाण्याची आवश्यकता असते. जागरूकता आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा कोकणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी मी नक्कीच मार्गदर्शन करत राहीन.