निवृत्तीनिमित्त आयोजित समारंभात न्यायमूर्ती चित्तरंजन दास यांचे विधान
कोलकाता – कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चित्तरंजन दास हे २० मे २०२४ या दिवशी निवृत्त झाले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या निरोप समारंभात मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की, ‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य आहे. रा.स्व. संघाने मला कोणत्याही साहाय्यासाठी किंवा सेवेसाठी बोलावले, तर मी संघटनेत परत जाण्यास सिद्ध आहे.’
कामामुळे रा.स्व. संघापासून ३७ वर्षे दूर !
न्यायमूर्ती दास पुढे म्हणाले, ‘‘मला रा.स्व. संघाविषयी फार आदर आहे. मी संघामध्येच लहानाचा मोठा झालो. मी रा.स्व. संघामध्ये धाडस, प्रामाणिकपणा, समभाव, देशभक्ती, कार्याविषयी वचनबद्धता इत्यादी गुण शिकलो. कामामुळे मी अनुमाने ३७ वर्षांपासून रा.स्व. संघापासून दूर आहे. मी माझ्या कारकीर्दीत पदोन्नतीसाठी कधीही संघाने नाव वापरले नाही; कारण असे करणे संघाच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. नोकरीत असतांना मी प्रत्येकाला समान वागणूक दिली. प्रत्येक जण माझ्यासाठी एकसारखाच होता. मी कुणाशीही भेदभाव केला नाही.’’