इराणच्या राष्ट्रपतींच्या अपघाती मृत्यूनंतर कोडी मठाच्या स्वामीजींचे भविष्य खरे ठरल्याची चर्चा !

वर्ष २०२४ मध्ये १-२ राष्ट्रप्रमुखांचा मृत्यू होईल, असे वर्तवले होते भाकीत !

शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी

बेंगळुरू (कर्नाटक) – इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे कर्नाटकातील कोडी मठाचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांनी यापूर्वी वर्तवलेले भाकीत खरे ठरले, अशी चर्चा चालू झाली आहे. या वर्षाच्या प्रारंभी गदग येथे भविष्य सांगतांना स्वामीजी म्हणाले होते की, ‘गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक संकटे येणार आहेत. अवेळी पाऊस पडून लाखो लोकांसमोर समस्या निर्माण होणार आहेत. प्रकृतीचा विकोप होऊन भूकंप आणि जल संकट यांचा सामना करावा लागेल.

त्यासह यावर्षी जगातील एका मोठ्या संतांची हत्या होईल, तसेच १-२ राष्ट्रप्रमुखांचा मृत्यूदेखील होईल, असे लक्षण आहे. देशात अस्थिरता, युद्धाची भीती, अणूबाँबचा स्फोट होण्याची शक्यता आहे. या वर्षांत अनेक दुर्घटना घडतील.’

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी

स्वामीजींचे हे भाकीत केल्यानंतर एक मासाच्या आतच बेंगळुरू येथील राघवेंद्र कॅफे येथे बाँबस्फोट होऊन अनेक लोक गंभीररित्या घायाळ झाले होते. काही दिवसांपूर्वीच स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांना ५ गोळ्या लागूनही ते बचावले आहेत.