‘श्रीमती वनिता गोविंद नारकर या माझ्या सासूबाई आहेत. त्यांना सर्व जण ‘माई’, असे म्हणतात. त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे मी येथे कृतज्ञताभावाने मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
१. उत्तम आरोग्य
आज वयाच्या ९५ व्या वर्षीही त्यांची प्रकृती उत्तम आहे. देवाची कृपा आणि माईंची साधना यांमुळे त्यांना चांगले स्वास्थ्य लाभले आहे. त्या दिवसभर कष्टाची कामे करत असत. त्या त्यांच्या लहानपणी पोहायला शिकल्या होत्या. त्यामुळे शरीर सुदृढ रहाण्यासाठी त्यांना एक प्रकारे लाभच झाला. त्यांची पचनशक्ती उत्तम आहे. त्या कुणाचाही आधार न घेता स्वतःची कामे स्वतः करत असतात. या वयातही त्यांना कोणताही आजार नाही. त्यांना केवळ रक्तदाब नियंत्रणासाठीच्या गोळ्या घ्याव्या लागतात.
२. स्वच्छता आणि टापटीपपणा
कितीही घाई असली, तरी माई स्वयंपाकघर नीटनेटके आणि स्वच्छ ठेवण्याला प्राधान्य द्यायच्या. ‘कपड्यांच्या घड्या घालतांना किंवा अंथरूण घालतांना त्याला सुरकुत्या राहू नयेत’, असा त्यांचा कटाक्ष असतो.
३. दैनिक ‘सनातन प्रभात’चे बारकाईने वाचन करणे
माईंचे त्या काळातील सातवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यांना वाचनाची पुष्कळ आवड आहे. या वयातही त्या चष्मा न लावता दैनिक ‘सनातन प्रभात’मधील मथळे वाचतात. त्या दैनिकाचे बारकाईने वाचन करतात. त्यांचा दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी पुष्कळ भाव आहे.
४. समाधानी वृत्ती
माई आपल्या आयुष्याविषयी समाधानी आहेत. ‘देवाने सर्वकाही भरभरून दिले आहे’, याबद्दल त्या कृतज्ञ आहेत. त्या नेहमी आनंदी, सकारात्मक आणि समाधानी असतात.
ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ती असू द्यावे समाधान ।। – तुकाराम गाथा, अभंग २८६७, ओवी २
अर्थ : भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे, त्या स्थितीत रहावे. चित्ती मात्र समाधान असावे.
संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगाप्रमाणे माई प्रत्यक्ष जीवन जगत आहेत.
५. कुटुंबियांचा आधारस्तंभ असलेल्या माई !
माई नेहमीच आमच्या कुटुंबियांचा आधार बनून राहिल्या आहेत. त्यांच्या २ मोठ्या सुना आणि मुले यांचा शिक्षकी व्यवसाय होता. सर्व एकत्र कुटुंबात रहात होते. सर्व जण शाळेत गेल्यावर माई न कंटाळता आणि न थकता अविरतपणे कौटुंबिक दायित्व आनंदाने पार पाडायच्या. सकाळची शाळा असल्यास सुनांना घरी आल्यावर साहाय्य व्हावे; म्हणून त्या बराचसा स्वयंपाक करून ठेवायच्या.
६. सुनेच्या पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाला विरोध न करणे
माझ्या विवाहानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये मला पुष्कळ मानसिक त्रास झाला होता. माझे यजमान आणि मुलगा यांच्या आजारपणामुळे मी मानसिकदृष्ट्या पूर्णतः खचून गेले होते. त्याच काळात मी सनातन संस्थेच्या संपर्कात आले आणि मला साधनेचे महत्त्व पटले. मी चांगले वेतन असलेली नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मुले लहान असतांना पूर्णवेळ साधना करण्याच्या माझ्या निर्णयाविषयी माई काहीच बोलल्या नाहीत. मी पूर्णवेळ आश्रमात रहात असतांना त्यांनी आणि माझ्या जाऊबाईंनी पहिल्या इयत्तेत शिकणार्या माझ्या मुलाला २ वर्षे सांभाळले.
७. अनुभूती – मुलगा आणि सून पूर्णवेळ साधना करण्यासाठी गेल्यावर दत्ताचा जप करणे, एकदा ‘प.पू. भक्तराज महाराज घरात बसले आहेत’, असे दिसणे अन् त्यानंतर श्रद्धा वाढणे
मी आणि माझे यजमान डॉ. रविकांत नारकर माझ्या लहान मुलाला माईंकडे ठेवून पूर्णवेळ साधना करू लागलो. त्यानंतर माईंना आमची काळजी वाटत असे, तसेच त्यांना भीतीही वाटत असे. ‘भीती वाटल्यावर ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करा’, असे आम्ही त्यांना सांगितले होते. त्याप्रमाणे त्या नामजप करायच्या. एकदा त्या घरी एकट्याच असतांना ‘काळी टोपी आणि पांढरे धोतर परिधान केलेले अन् हातात काठी घेतलेले प.पू. भक्तराज महाराज घरात बसले आहेत’, असे त्यांना दिसले. नंतर ते अदृश्य झाले. प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन झाल्यामुळे त्यांची श्रद्धा वाढण्यास साहाय्य झाले.
‘गुरुदेवांनी मला सासूबाईंकडून शिकण्याची संधी दिली आणि माझ्याकडून त्यांची गुणवैशिष्ट्ये लिहून घेतली’, याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर (वय ६२ वर्षे, श्रीमती वनिता नारकर यांची सून), देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (८.३.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |