वाईट शक्तींनी केलेली आक्रमणे आणि त्या वेळी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

सौ. स्नेहल गांधी

१. अपघातात हाताचे हाड मोडणे

‘मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी २ वेळा माझे किरकोळ अपघात झाले होते. तेव्हा माझ्या हाताचे हाड मोडले होते; पण मला गंभीर दुखापत झाली नव्हती.

२. चालत्या गाडीचे दार अकस्मात् उघडले जाऊन गाडीतून बाहेर पडल्यामुळे जखमा होणे

त्यानंतर आम्ही कुटुंबीय पूर्णवेळ साधना करण्यासाठी गोव्याला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आलो. वर्ष २०१६ मध्ये निवासस्थानाहून आश्रमात येतांना ‘ट्रॅक्स’ गाडीचे दार आपोआप उघडले जाऊन मी ‘खडपाबांध’ इमारतीसमोर पडले. तेव्हा मला थोड्या जखमा झाल्या; पण आश्रमातील आधुनिक वैद्यांनी उपचार केल्यावर मी बरी झाले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मला सौ. विद्या शानभाग यांच्याकडून ‘हे वाईट शक्तींनी केलेले मोठे आक्रमणच होते’, असा निरोप पाठवला.

३. कूकरचे झाकण उडाल्यामुळे आतील शिजलेली डाळ अंगावर पडून भाजणे

वर्ष २०२१ मध्ये मी अल्पाहाराची सेवा करत असतांना अकस्मात् कूकरचे झाकण उडून आतील शिजलेली डाळ माझ्या अंगावर पडल्याने मला भाजले. तेव्हाही आश्रमातील आधुनिक वैद्यांनी उपचार केल्यावर मी बरी झाले.

याविषयी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारल्यावर त्यांनी ‘हे आक्रमणच होते’, असे सांगून स्वतःच माझ्यासाठी नामजप केला.

४. आसंदीचा पाय मोडल्यामुळे पडणे

अ. एकदा मी सेवेसाठी बसलेल्या आसंदीचा पाय मोडल्यामुळे पडले; पण मला फारसे लागले नव्हते.

आ. त्यानंतर आता १३.२.२०२३ या दिवशी माझी सेवा अंतिम टप्यात आली असतांना अकस्मात् पुन्हा आसंदीचा पाय मोडून मी खाली पूर्ण आडवी पडले. मला थोडासा मुका मार लागला; पण परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने अधिक लागले नाही. त्या ‘आसंदीला आधी तडे गेले होते’, असे काहीच झाले नव्हते. ती व्यवस्थित होती. याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारल्यावर त्यांनी ‘हे आक्रमणच होते’, असे सांगून उपायांसाठी मला नामजप करायला सांगितला.

५. कृतज्ञता

कृपाळू गुरुमाऊली, केवळ आणि केवळ आपल्या कृपेमुळे प्रत्येक वेळी मी अपघातातून वाचले आणि विशेष दुखापतही झाली नाही. आपण माझे केवढे मोठे प्रारब्ध सुकर करत आहात. ‘मला केवळ सुईच्या टोकाएवढेच भोगावे लागते’, यासाठी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे. ‘मला आपल्या चरणी सदैव कृतज्ञताभावात रहाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– सौ. स्नेहल संतोष गांधी, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (१९.२.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक