आपल्या औषधांचे मूल्य आणि रुग्णालयाचे दर सरकार ठरवते. आपल्या मुलांनी शाळेत, महाविद्यालयात काय शिकावे ? त्याचे शुल्क किती असावे ? हे सरकार ठरवते. आपल्या घरात येणारे अन्नधान्य, घरात येणारे पाणी कुठून आणि किती रुपये दराने यावे ? हेही सरकार ठरवते. पेट्रोलचे दर, विजेचे दर, शेतीत पिकलेल्या मालाचा बाजारभाव सरकार ठरवते. जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आपल्या आयुष्यात सरकारचा कुठे ना कुठे हस्तक्षेप असतो. असे आपल्या जगण्यावर दिवसरात्र प्रभाव टाकणारे सरकार आपण ज्या वेळी निवडून देतो, त्याविषयी जागरूकता तर असायलाच हवी. या निवडणूक प्रक्रियेतून निवडून येणारा लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघाचा विकास करतांना देशाच्या विकासाला हातभार लावत असतो. त्यामुळे योग्य पद्धतीने केलेले मतदान नागरिकांच्या हक्कांचे रक्षण आणि लोकशाहीला बळकट करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते.
भारताच्या राजकारणात वाईट, भ्रष्ट, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा भरणा अधिक झाला आहे, असे नेहमीच म्हटले जाते; पण अशा प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींचा संसद आणि विधीमंडळ येथील भरणा रोखायचा असेल, तर आपण त्यासाठी किती दक्ष असतो ? मतदान न करता सरकारवर आरोप करून काहीच निष्पन्न होणार नाही. मतदानातून योग्य सरकार स्थापन करण्यात शहाणपण आहे; मात्र असे असूनही बहुतांशी लोकांची मानसिकता ‘५ वर्षे तुम्ही काय करता, हे आम्ही विचारणार नाही आणि आम्ही काय करतो, ते तुम्ही विचारू नये’ अशी असते, ज्याचे प्रतिबिंब मतदानाच्या टक्केवारीत दिसून येते; मात्र ‘माझ्या मतदान करण्याने काय फरक पडणार आहे ?’ हा विचार काढायला हवा; कारण असा विचार अनेकांनी केला, तर ती संख्या अधिक होते.
निवडणुकांच्या वेळी राजकारण्यांनी केलेली अश्लाघ्य भाषणे आणि इतरांवर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन केलेली टीका, वैयक्तिक लाभासाठी पक्ष पालटणारे नेते आदी सूत्रेही भारतीय राजकारणाचा खालावलेला स्तरच दर्शवतात. या राजकीय लोकांनी व्यवस्थेची थट्टा केल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात, तेव्हा समाजाने या नेत्यांना यासाठी जाब विचारावा. लोकशाही ही खर्या अर्थाने लोकशाही राहिली आहे का ? याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा. राजकारण अतिशय खालच्या पातळीवर गेलेले आहे, असे आपण म्हणतो; पण ही स्थिती सुधारण्यासाठी आपण काय करतो ? त्यासाठी उमेदवार दाखवत असलेल्या आमिषांना न भुलण्याचा निर्धार व्हायला हवा. लोकराज्यातील मतदार जागृत व्हायला हवा. कर्तव्य म्हणून मतदान करून राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती जाज्वल्य निष्ठा असलेला उमेदवार निवडून देण्यासाठी योग्य मतदान केले पाहिजे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे