अनेक जणांकडून घरी काही कार्य असले की, विशेषत: कार्यासाठीच्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेत चालढकल केली जाते. अनेकदा स्वस्त मिळतील; म्हणून गुणवत्तेने कमी असलेले धान्य, तूप किंवा अन्य साहित्याचा विचार केला जातो; मात्र असा विचार चुकूनही करू नये. ‘व्यक्ती ज्या गुणवत्तेचे अन्न सेवन करते, त्याच गुणवत्तेचे अन्न तिच्या देवतांना अर्पण केले जावे’, असे शास्त्रवचन आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श इथेही घेण्याजोगा आहे. चाफळच्या श्रीरामासाठी महाराज १२० खंडी (९६ सहस्र किलो) धान्य प्रतिवर्षी पाठवत असत. कदाचित् तशी आवश्यकता लागत नसल्याने काही काळाने हे धान्य घेणे चाफळहून बंद झाले. तेव्हा महाराजांनी पत्र लिहून आपल्या अधिकार्याला कळवले, ‘तिथे घेवोत वा न घेवोत, प्रतिवर्षी आपल्याकडे १२० खंडी धान्य वेगळे काढलेले असले पाहिजे. जेव्हाही आवश्यकता पडेल, तेव्हा ते धाडले पाहिजे आणि क्वचित् आपल्याला नाईलाज म्हणून त्याचा वापर करावा लागला अन् नेमकी तेव्हाच चाफळहून मागणी आली, तर बाजारभावाने धान्य किंवा रक्कम देण्यात यावी !’
देव/पितृकार्यात उत्तमोत्तम अर्पण केले, तर आपले इष्ट/आराध्य/पितर आपल्यालाही सदैव संपन्न ठेवणार आहेत. जर यात चालढकल केली, तर तेही फिरून तुमच्याकडेच येणार आहे. ‘दिवस पालटायला वेळ लागत नाहीत’, असे म्हणतात. नको तिथे तडजोडी करू नका !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१८.५.२०२४)