अर्ध्या तासात पडलेल्या पावसात नद्या प्रवाहित

अडरे (चिपळूण) येथे ढगफुटीसदृश पाऊस

चिपळूण – राज्यात वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस पडेल, असे हवामान विभागाकडून अंदाज वर्तवला जात आहे. या अंदाजाप्रमाणे अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. १९ मे या दिवशी मात्र तालुक्यातील अडरे, अनारी आणि परिसरांतील गावांत  ढगफुटीसदृश पाऊस  पडला आहे.  केवळ अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे आणि अनारी परिसरातल्या नद्या आणि ओहोळही जोरदार प्रवाहित झाल्या आहेत. अर्ध्या तासात ११० मी.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.

जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो, त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांना मे महिन्यातही अनुभवायला मिळाला आहे. या मुसळधार पावसामुळे अनारी गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्यही वाहून गेले. या गावांत पाण्याने तुडुंब भरून गेलेली शेते आणि दुथडी भरून वहाणार्‍या नद्यांचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित होत आहेत.