बिश्केक (किर्गिजस्तान) – सोव्हिएत रशियापासून स्वतंत्र्य झालेल्या देशांपैकी एक असलेल्या किर्गिजस्तान देशाची राजधानी बिश्केकमध्ये १७ मेच्या रात्री स्थानिक तरुणांच्या जमावाने परदेशी विद्यार्थ्यांवर आक्रमण केले. हे सर्व विद्यार्थी येथील ४ वैद्यकीय विद्यापिठांमध्ये शिक्षण घेत आहेत. या आक्रमणात भारतीय विद्यार्थ्यांनी एका कॅफेमध्ये लपून स्वतःचा जीव वाचवला. भारतीय विद्यार्थ्यांपैकी कुणीही घायाळ झाला नाही; मात्र पाकचे ४ विद्यार्थी घायाळ झाले असून त्यांतील एकाची प्रकृती गंभीर आहे. यासह बांगलादेशातील काही विद्यार्थीही घायाळ झाले आहेत. यापूर्वी जमावाने केलेल्या आक्रमणात पाकचे ३ विद्यार्थी मृत्यूमुखी पडले आहेत. किर्गिजस्तानमध्ये १५ सहस्रांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिकत आहेत.
१३ मे या दिवशी स्थानिक तरुणांनी इजिप्तच्या एका विद्यार्थिनीची छेड काढली होती. यामुळे इजिप्तच्या विद्यार्थ्यांनी या तरुणांना मारहाण केली होती. यात एका स्थानिकाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. त्याचा सूड उगवण्यासाठी तरुणांनी परदेशी विद्यार्थ्यांवर आक्रमण केले. या घटनेनंतर भारताने भारतीय विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या बाहेर न पडल्याचा सल्ला दिला आहे.