राजापूर – तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक पतसंस्था फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह १ कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे. ही घटना १४ मे या दिवशी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली.
मिठगावणे येथे श्रमिक पंतसंस्थेत काम करणारे कर्मचारी १४ मे या दिवशी नेहमीप्रमाणे पतसंस्थेमध्ये गेले असता त्यांना पतसंस्थेचे ‘शटर’ आणि दरवाजाची कडी कोयंडी उचकटलेली दिसून आली. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना पतसंस्थेतील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच पतसंस्थेतील रोख रक्कम आणि ९० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर पतसंस्थेतील कर्मचार्यांनी नाटे पोलिसांना याविषयी कळवले. नाटे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पंचनामा केला. सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपपोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड हे वरिष्ठ पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या वेळी श्वान पथक बोलावण्यात आले. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातूनही पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सोने ठेवण्याचे ‘लॉकर’ फोडण्यात आले. त्यातील अनुमाने २०० तोळे सोन्याची चोरी झाली आहे.