‘रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करत असतांना मला स्वयंपाकघरातील साधिकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. एखादा साधक बराच वेळ भांडी घासत असल्याचे लक्षात येताच सतर्कतेने त्याला बैठी सेवा देणे
स्वयंपाकघरातील सर्व उत्तरदायी साधिका सतर्क राहून सेवा करणार्या अन्य साधकांकडे लक्ष देतात. एखादा साधक ३० ते ४५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ भांडी घासण्याची सेवा करत असेल किंवा पाण्याशी संबंधित सेवा करत असेल, तर त्या साधिका त्या साधकाला लगेचच बैठी सेवा देतात. यातून त्यांचा ‘साधकांची कुटुंबियांप्रमाणे काळजी घेणे’, हा गुण लक्षात आला.
२. साधकांना प्रतिदिन नवनवीन सेवा देऊन त्यांचा उत्साह टिकवून ठेवणे
स्वयंपाकघरातील साधिका प्रतिदिन साधकांना नवनवीन सेवा देतात. त्यामुळे साधकांना नवीन शिकण्यातील आनंद मिळतो. ‘साधक सलग एकच सेवा करत बसला’, असे होत नाही. सेवांमध्ये विविधता आल्याने त्यांचा उत्साह टिकून रहातो.
३. प्रत्येक गोष्टीचा अत्यंत काटकसरीने वापर करणे
भाजी निवडतांना किंवा फळे आदी कापतांना त्यांचा वापर अत्यंत काटकसरीने केला जातो. साधक ‘त्यातील थोडाही तुकडा वाया जाऊ नये’, याचा आटोकाट प्रयत्न करतात.
४. साधकांमधील अनावश्यक बोलणे टाळण्यासाठी जयघोष करणे आणि नामजपाची आठवण करणे
काही वेळा एकत्रित सेवा करतांना ‘साधक अनावश्यक बोलत आहेत’, असे लक्षात येताच उत्तरदायी साधिका जयघोष करायला सांगतात किंवा नामजप करत सेवा करण्याची आठवण करून देतात.
५. स्वयंपाकघरातील साधिका स्वतः सर्व साधकांसमोर क्षमायाचना करत असल्याने प्रक्रियेसाठी आलेल्या साधकांना मोकळेपणाने स्वतःच्या चुका सांगता येणे
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी रामनाथी (गोवा) आश्रमात आलेल्या साधकांना सेवेसाठी स्वयंपाकघरात सेवा असते. तेथील उत्तरदायी साधिका सर्व साधकांसमोर स्वतःच्या चुका मोकळेपणाने सांगून क्षमायाचना करतात. त्यामुळे प्रक्रियेला आलेले साधकही स्वतःच्या चुका मोकळेपणाने सांगू शकतात. त्यांना इतरांसमोर चुका सांगून क्षमायाचना करायला काहीच संकोच वाटत नाही. ‘कृतीतून साधना शिकवणे कसे असते ?’, हे या साधिकांकडून शिकता येते.
६. प्रत्येक गोष्ट विचारूनच करायची शिकवण पाळली जात असल्याने साधकांत ‘विचारून करणे’ हा गुण निर्माण होऊन ‘मनाने करणे’ हा अहंचा पैलू न्यून होणे
स्वयंपाकघरात कुणीही उत्तरदायी साधिका पू. रेखा काणकोणकर किंवा सौ. सुप्रिया माथुर यांना विचारल्याविना कोणताही निर्णय देत नाहीत. कोणती भाजी चिरायची ? फोडीचा आकार कसा असावा ? चिरलेली भाजी योग्य प्रकारे चिरली आहे ना ? दुधी भोपळा, काकडी आदींची चव कडवट नाही ना ? अशा एक ना दोन, सर्वच गोष्टींची शहानिशा उत्तरदायी साधिकांना विचारूनच केली जाते. हाच संस्कार त्या साधिका अन्य साधकांवरसुद्धा करतात. त्यामुळे साधकांत ‘विचारून करणे’ हा गुण निर्माण होतो आणि ‘मनाने करणे’ हा अहंचा पैलू न्यून होतो.
७. स्वयंपाकघरात सेवा करतांना साधकांतील आपलेपणा आणि त्यांचा भाव यांमुळे सत्संगासारखे वातावरण असते. त्यामुळे तेथे प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप आपोआपच होतो. त्यासाठी निराळे प्रयत्न करावे लागत नाहीत.
८. साधकांना थोड्या थोड्या वेळाने सूचनासत्र करण्याची आठवण करणे आणि त्यासाठी हातातील सेवा बाजूला ठेवून सूचनासत्र करायला सांगितल्याने आपोआपच साधकांच्या सूचनासत्र करण्यात नियमितता येणे आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य निर्माण होणे
स्वयंपाकघरातील सर्वांत महत्त्वाचा शिकायला मिळालेला पैलू म्हणजे साधक एकमेकांना सूचनासत्र करण्याची आठवण करतात आणि उत्तरदायी साधिका त्यासाठी वेळ उपलब्ध करून देतात. प्रसंगी हातातील सेवा बाजूला ठेवून सूचनासत्र पूर्ण करायला सांगतात. त्यामुळे आपोआपच साधकांच्या सूचनासत्र करण्यात नियमितता येते आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य निर्माण होते. ‘प्रयत्नांमध्ये सवलत घेतली’, असे होत नाही.
९. आश्रमातील सर्व साधकांप्रमाणे ‘आदल्या दिवशीचे अन्न प्रथम संपवायचे आणि नंतर ताजे घ्यायचे’ हा नियम तंतोतंत पाळणे
स्वयंपाकघरातील साधिकांना तेथे नियमित सेवा करत असल्याने कोणती भाजी ताजी, कोणती जुनी झाली आहे इत्यादी सर्वच गोष्टी ठाऊक असतात. त्यांनी विचार केला, तर त्या प्रतिदिन ताजे जेवण प्राधान्याने जेवू शकतात; परंतु त्या तसे करत नाहीत. सर्व साधकांप्रमाणे ‘आदल्या दिवशीचे अन्न प्रथम संपवायचे आणि नंतर ताजे घ्यायचे’ हा आश्रमातील सर्व साधकांसाठीचा नियम त्या तंतोतंत पाळतात.
१०. प्रत्येक साधक आणि संत यांचे पथ्य-पाणी सांभाळणे
आश्रमात नानाविध प्रकृतीचे आणि वयस्कर साधक आहेत. तसेच बर्याच संतांचाही निवास आहे. या सर्वांना आरोग्याच्या दृष्टीने विविध पथ्ये आहेत. स्वयंपाकघरातील साधिका सर्वच साधक आणि संत यांचे पथ्य-पाणी तंतोतत सांभाळतात. या साधिकांना ‘प्रत्येकाला काय हवे-नको’, हे ठाऊक असते. यात काही चूक झाल्यास या साधिका संबंधित साधक-संत यांची क्षमायाचना करून त्या चुकीसाठी प्रायश्चित्तसुद्धा घेतात.
११. पू. रेखा काणकोणकर आईच्या मायेने सर्वत्र लक्ष ठेवत असणे
स्वयंपाकघरात सेवांचा व्याप मोठा असल्याने पू. रेखाताई सकाळपासून रात्रीपर्यंत पुष्कळ व्यस्त असतात. तरीसुद्धा त्यांचे प्रत्येक साधकाकडे आईप्रमाणे लक्ष असते. कुणाचे काय चुकते ? कुणाचा वेळ वाया जात नाही ना ? कुणाला काही त्रास होत नाही ना ? या सर्व गोष्टी त्या स्वतः पहात असतात. त्या तत्परतेने साधकांना त्या त्या वेळी साहाय्यसुद्धा करतात. त्यांचे अन्य साधकांशी चालू असलेले बोलणे ऐकूनसुद्धा आपला भाव जागृत होतो.’
– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०२३)