साधकांच्या लिखाणाचे प्राथमिक संकलन करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

१७.५.२०२४ या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

या आधीचा भाग पाहण्याकरिता येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/794514.html

३. शिकायला मिळालेली सूत्रे

पू. शिवाजी वटकर

३ आ. मानसिक स्तरावर 

३ आ १. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी संकलनाची सेवा देणे : आरंभी संकलन सेवा करतांना मनाचा संघर्ष होत होता. कर्तेपणा या अहंच्या पैलूमुळे अधूनमधून ताण येत होता. माझ्यातील ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी संकलनाची सेवा दिली आहे’, असे वाटते. हळूहळू सहसाधक आणि परात्पर गुरु डॉक्टर माझ्याकडून सेवा करवून घेत आहेत. मला सेवेतील आनंद मिळत आहे.

३ आ २. साधकांच्या अनुभूतीतून परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा अनुभवणे :  संकलनाची सेवा करतांना ‘साधकांना साधना करतांना प्रारब्धामुळे अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. गुरुकृपेने त्यांना अनुभूती येतात. त्यांची साधनेत प्रगती होते’, हे शिकायला मिळाले. काही वेळा ‘मलाच कौटुंबिक अडचणी आहेत. मीच साधनेचे चांगले प्रयत्न करतो’, असा माझ्यात भ्रम निर्माण होत असतो; मात्र ‘साधकांचे लिखाण संकलित करतांना त्यांच्यापुढे माझी साधना अन् माझ्या अडचणी नगण्य आहेत’, याची जाणीव होते. ‘परात्पर गुरु डॉक्टर मला कसे साहाय्य करत आहेत’, याची जाणीव होते. साधकांना अनेक असह्य त्रास आहेत आणि त्यांना दुःख भोगावे लागते; मात्र परात्पर गुरु डॉक्टरांनी मला फुलासारखे सांभाळले आहे. ‘त्यांनीच माझा सर्व भार उचललेला आहे’, याची मनोमन जाणीव होऊन सेवा करतांना कृतज्ञताभाव जागृत होतो.

३ आ ३. संकलन सेवा करतांना ‘स्व’चा विचार अल्प होऊन आनंद मिळणे : संकलन करतांना लिखाण ३ – ४ वेळा लक्षपूर्वक वाचावे लागते. त्यामुळे त्यामध्ये मन गुंतल्याने अनुसंधानात रहाता येते. संकलन करतांना मनाला उभारी येते. लेखकाच्या भूमिकेत गेल्याने ‘स्व’चा विचार अल्प झाल्याने अवर्णनीय आनंद मिळतो.

३ इ. साधनेच्या दृष्टीने 

३ इ १. व्यष्टी साधनेची संधी मिळणे : संकलन सेवा करतांना माझ्याकडून अनेक चुका होतात आणि अधूनमधून स्वभावदोष उफाळून येतात; मात्र परात्पर गुरु डॉक्टर मला चुका स्वीकारण्यास आणि त्यातून शिकून घेऊन पुढे जाण्यासाठी बळ देतात. ही सेवा करतांना व्यष्टी साधना करण्याची संधी मिळते, उदा. प्रत्येक गोष्ट विचारून करणे, प्रेमभाव वाढवणे, कार्यपद्धतीचे पालन करणे इत्यादी.

३ इ २. साधकांच्या लिखाणातून तळमळ, भाव, शरणागती इत्यादी गुण शिकतांना आनंद मिळणे : या सेवेतून मला ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्व साधकांकडून साधना आणि सेवेचे प्रयत्न कसे करवून घेत आहेत ?’, हे शिकायला मिळत आहे. प्रसंगानुरूप लेखन करणार्‍या साधकांशी मानस किंवा स्थुलातून अधूनमधून बोलले जाते. ‘सनातनच्या साधकांमध्ये तीव्र तळमळ आणि पुष्कळ भाव आहे’, हे लक्षात येते. त्यांचा ‘गुरुदेवांप्रती भाव, शरणागती, प्रार्थना, कृतज्ञता इत्यादी’, मला शिकायला मिळते. ही सेवा करतांना साधकांच्या लिखाणातून शिकण्यातील आनंद मिळतो.

३ इ ३. साधनेत प्रगती होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी सेवा देणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार, धर्मरक्षण, अर्पण गोळा करणे, आश्रमातील सेवा इत्यादी सेवा देऊन मला माध्यम बनवले आहे. मला केवळ माध्यम बनवले आहे, असे नव्हे, तर त्यातून माझी आध्यात्मिक प्रगती करवून घेतली आहे. त्याचप्रमाणे आता वयोमानानुसार मला त्यांनी संकलन करण्याची बैठी सेवा देऊन उपकृत केले आहे. त्यांनीच माझ्याकडून त्यांना अपेक्षित साधना आणि सेवा करवून घ्यावी, हीच परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना !

३ ई. आध्यात्मिक स्तरावर 

३ ई १. निर्गुण चैतन्याच्या अनुसंधानात रहाण्याचा आनंद मिळणे : बहुतेक लिखाणाचा केंद्रबिंदू परात्पर गुरु डॉ. आठवले हा असतो. त्यामुळे सतत त्यांच्या निर्गुण चैतन्याच्या अनुसंधानात रहाण्याचा आनंद मिळतो.

३ ई २. सत्मध्ये राहून चैतन्यशक्ती मिळणे : संकलन करतांना मनन आणि चिंतन झाल्यामुळे सत्मध्ये रहाता येते. त्यातून मला शब्द आणि नाद यांच्यातील चैतन्यशक्ती मिळते.

४. लिखाण करणार्‍या साधकांच्या भावावस्थेशी एकरूप होऊन सेवा होणे

सेवा करतांना कृतीला भाव जोडून सेवा करायची असते. माझ्यात व्यक्त भाव अल्प असल्याने भावावस्थेत जाऊन सेवा करणे मला कठीण जाते. संकलनाची सेवा करतांना ‘साधकांच्या लिखाणातील भावामुळे माझी भावपूर्ण सेवा होण्यास साहाय्य होते. परात्पर गुरु डॉक्टर मला साधकांच्या भावस्थितीला नेऊन माझ्याकडून संकलन सेवा करवून घेतात’, असे वाटते.

५. गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता

सनातन संस्थेमध्ये संकलनाची उत्तम प्रकारे सेवा करणारे अनेक साधक आहेत. तरीही मला शिकण्यासाठी, भावावस्था आणि आनंद अनुभवण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला संकलन करण्याची दिलेली संधी, म्हणजे माझ्यावर केलेली अनंत कृपाच आहे. त्यांच्या कृपेने ही सेवा करतांना मला शब्दशक्ती, नादशक्ती आणि चैतन्यशक्ती यांच्या त्रिवेणी संगमात मी न्हाऊन निघत आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’     (समाप्त)

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक