Syed Mustafa Kamal : भारत चंद्रावर पोचला, तर कराचीमध्ये मुले उघड्या गटारात पडून मरतात !  

पाकिस्तानचे खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांची संसदेत पाकच्या व्यवस्थेवर टीका !

पाकच्या संसदेत बोलतांना सैयद मुस्तफा कमाल

इस्लामाबाद (पाकिस्तान) – दूरचित्रवाणीवर आम्ही बातमी पहातो की, भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. या बातमीच्या अवघ्या काही सेकंदात दुसरी बातमी झळकते की, कराचीमधील उघड्या गटारात पडून लहान मुलाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी बातम्या प्रत्येक तिसर्‍या दिवशी ऐकायला मिळतात, अशा शब्दांत पाकिस्तानच्या ‘मुत्तहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान’ या पक्षाचे खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांनी थेट पाकच्या संसदेत पाकमधील व्यवस्थेवर केली. त्यांच्या विधानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

सय्यद मुस्तफा कमाल पुढे म्हणाले की,

१. पाकिस्तानची २ मोठी बंदरे कराचीमध्ये आहेत. मध्य आशिया आणि अफगाणिस्तान येथे प्रवास करण्यासाठी कराची हे मोक्याचे ठिकाण आहे. कराचीमधून पाकिस्तानला ६८ टक्के महसूल मिळतो; मात्र मागच्या १५ वर्षांत कराचीला स्वच्छ पाणीही देता आलेले नाही. कराची शहराला जो पाणीपुरवठा होतो, तोही पाणी माफियाकडून चोरला जातो. हाच चोरलेला पाणीसाठा पुन्हा चढ्या भावाने कराचीमधील लोकांना विकला जातो.

२. पाकिस्तानमधील २ कोटी ६२ लाख मुले शाळेत जात नाहीत. ही संख्या जगातील ७० देशांमधील एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या  निरक्षर मुलांमुळे पाकिस्तानची होत असलेली आर्थिक प्रगती उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. एकट्या सिंध प्रांतात कागदावर ४८ सहस्र शाळा आहेत; मात्र त्यांपैकी ११ सहस्र शाळा कुठेही अस्तित्वात नाहीत. सिंध प्रांतातील ७० लाख मुळे शाळाबाह्य (शाळेत न जाणारी) आहेत.

पाकिस्तानात २ कोटी २८ लाख मुले शाळाबाह्य !

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा शाळाबाह्य मुले असलेला देश आहे. पाकिस्तानमधील ५ ते १६ वर्ष वयोगटातील २ कोटी २८ लाख मुले शाळाबाह्य आहेत. हे प्रमाण पाकिस्तानच्या लोकसंख्येपैकी ४४ टक्के इतके आहे.

संपादकीय भुमिका

पाकिस्तानची ही स्थिती त्यांच्याच खासदाराने निदर्शनास आणून दिल्यानंतर तरी पाकमध्ये काही सुधारणा होण्याची शक्यता नाही. पाकिस्तानला कोणतेच भविष्य नाही, हे येत्या काही वर्षांत जगाला दिसून येणार आहे !