मोठ्या फलकांचे संरचनात्मक लेखा परीक्षण न केल्यास गुन्हे नोंदवणार ! – सातारा नगरपालिका

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, १५ मे (वार्ता.) – घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर सातारा नगरपालिका सतर्क झाली आहे. सातारा नगरपालिकेने शहरातील सर्व मोठे फलक लावणार्‍यांना (होर्डिंग आणि फ्लेक्स धारक) १४ मे या दिवशी नोटिसा पाठवल्या आहेत. यामध्ये ३ दिवसांच्या आत सर्व होर्डिंग्ज आणि फ्लेक्स यांचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून ते पालिकेमध्ये सादर करावे, अन्यथा होर्डिंग शासनाधीन करून संबंधितांवर गुन्हे नोंद करण्यात येतील, अशी चेतावणी नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

घाटकोपर येथील घटनेनंतर राज्यातील होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सातारा पालिका प्रशासनाने याची गंभीर नोंद घेऊन उपाययोजना म्हणून पालिकेच्या जागेवर आणि खासगी मिळकतींवर लावण्यात आलेल्या होर्डिंग्ज अन् फ्लेक्सधारक यांना नोटिसा पाठवल्या आहेत. ज्या इमारतींवर होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत, अशा इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण, मिळकतधारकांशी केलेला करारनामा, मिळकतदार आणि सातारा नगरपालिकेने होर्डिंगसाठी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ३ दिवसांत नगरपालिकेमध्ये सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हे नोंद करून होर्डिंग शासनाधीन करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही सातारा नगरपालिकेच्या वतीने संबंधितांना देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

ही कृती अगोदर का केली नाही ? मोठ्या दुर्घटना झाल्यावर जागे होणारे प्रशासन नको, तर दुर्घटनाच होऊ नये, यासाठी प्रयत्न करणारे प्रशासन हवे !