१. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या बांधकामाची सेवा चालू असतांना घरातील अडचणींमुळे सेवेसाठी जाऊ न शकणे
‘मला फॅब्रिकेशनची सेवा येत असल्याने वर्ष २००५ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या बांधकामाची सेवा चालू झाल्यानंतर श्री. राहुल कुलकर्णी मला ‘‘रामभाऊ, आश्रमात सेवेसाठी कधी येता ?’’, असे विचारत असत. तेव्हा मी माझ्या गावी मजुरीने कामाला जात होतो. घरी ७ ते ९ वर्षांची दोन लहान मुले होती आणि आम्हाला आर्थिक अडचण होती. माझ्या घरून आश्रमात साधना करण्यासाठी जायला थोडा विरोधही होता. त्यामुळे मला २ वर्षे आश्रमात जाता आले नाही; मात्र मी गावी सेवा करत होतो.
२. आश्रमात जायचा ध्यास लागणे आणि प्रतिदिन गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर उभे राहून त्यांना आत्मनिवेदन करणे
मला २ वर्षे एकच ध्यास होता, ‘माझ्याकडे फॅब्रिकेशनची कला आहे. मला आश्रमात जायचे आहे.’ ‘मला आश्रमात सेवेसाठी जायचे आहे’, असा जणू माझा एकप्रकारे जप चालू असे. आमच्या घरात एका कोनाड्यात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) एक छायाचित्र ठेवले होते. मी कामावरून घरी आल्यावर गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर उभे राहून त्यांना सांगत असे, ‘मला सेवेसाठी आश्रमात जायचे आहे.’ मी कामावरून येतांना आणि सायकलवरून प्रवास करतांना माझ्या मनात एकच विचार असे, ‘मी आश्रमात कधी जाणार ?’
३. कौटुंबिक दायित्व निभावणे
त्या वेळी माझ्यावर अधिकोषाचे ५ सहस्र रुपये ऋण होते. मी माझ्या एका ओळखीच्या मित्राकडून पैसे उधार घेतले आणि अधिकोषाचे ऋण फेडले. मी घरातील व्यक्तींसाठी धान्याची सोय केली. आमच्या घरी चूल असल्यामुळे मी लाकडाची सोय केली. मी उत्तरदायी साधकांना सांगितले, ‘‘मला बांधकामाच्या सेवेसाठी आश्रमात जायचे आहे.’’
४. मी आश्रमात दोन मास सेवेसाठी आलो. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने माझी आश्रमात सेवा करण्याची इच्छा पूर्ण झाली. माझी पत्नी (सौ. अनिता) आणि दोन्ही मुले (श्री. रामदास आणि श्री. दीपक) यांची आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा पूर्ण झाली.
५. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही मुलांनी ‘नोकरी किंवा व्यवसाय करून पैसा मिळवावा’, अशी अपेक्षा नसणे आणि ‘मुले आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत’, याचा आनंद असणे
आमची आर्थिक परिस्थिती बेताची होती, तरीही माझ्या मनात ‘मुले मोठी झाल्यानंतर त्यांनी नोकरी किंवा व्यवसाय करून पैसा मिळवावा’, असा विचार आला नाही. ‘मुले आश्रमात राहून पूर्णवेळ साधना कसे करतील’, यासाठीच श्री गुरूंच्या कृपेने माझ्याकडून प्रयत्न झाले. आमच्या लहान मुलाला (दीपकला) साधनेची आवड होती; पण मोठा मुलगा (श्री. रामदास) एवढा सक्रीय नव्हता. गुरूंची कृपा अशी की, त्याची इयत्ता १२ वीची परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुटीत साधक श्री. रामदास कोकाटे यांच्या समवेत तो आश्रमात गेला. मुलाने घरून निघतांना आम्हाला सांगितले, ‘‘मी ८ दिवसांत घरी येईन’’; मात्र तेव्हा तो आश्रमात १५ ते २० दिवस राहिला. नंतर तो मला म्हणाला, ‘‘मी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो.’’
त्याला एखादी मोठी नोकरी लागली असती, तर मला झालेल्या आनंदापेक्षाही अधिक आनंद ‘तो पूर्णवेळ साधना करणार’, हे ऐकून मला झाला.
हे गुरुदेवा, मला लिहायला जमत नाही. तुमच्या कृपेमुळेच मी लिहू शकलो, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. रमेश गोडसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.४.२०२४)