IFC Singapore And IndianNavy : दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या नौकांचा ताफा तैनात !

भारतीय नौदलाच्या ३ नौका सिंगापूरमध्ये पोचल्या !

सिंगापूर : दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाने नौकांचा ताफा तैनात करणे चालू केले आहे. याचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाच्या ३ नौका सिंगापूरमध्ये पोचल्या आहेत. त्यामुळे दोन्ही नौदलांमधील संबंध अधिक दृढ झाले आहेत.

रिअर अ‍ॅडमिरल राजेश धनखड यांच्या नेतृत्वाखालील भारतीय नौदलाची ‘देहली’, ‘शक्ती’ आणि ‘किल्टन’ नावाच्या नौका सिंगापूरला पोचल्या, असे भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या एका ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे.

भारत आणि सिंगापूर यांच्यातील संबंध दृढ !

सिंगापूर नौदलाचे अधिकारी आणि सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त यांनी भारतीय नौकांचे जोरदार स्वागत केले. हा दौरा दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या एका मोहिमेचा भाग आहे. अनेक उपक्रम आणि कार्यक्रम यांच्या माध्यमातून दोन्ही सागरी राष्ट्रांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी या नौकांचा ताफा दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

सध्या दक्षिण चीन समुद्रात भारत त्याचे स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून भारत फिलीपिन्स आदी देशांशी संबंध दृढ करत आहे. चीनला घेरण्यासाठी भारताने अधिक आक्रमक होणे, ही काळाची आवश्यकता आहे !