बेंगळुरू (कर्नाटक) – ‘इस्रो’ने ‘अर्ध क्रायोजेनिक इंजिन’च्या निर्मितीमध्ये एक महत्त्वपूर्ण चाचणी उत्तीर्ण केली आहे. ‘सेमी-क्रायोजेनिक इंजिन’ चालू करण्यासाठी ‘प्री-बर्नर’ला प्रज्वलित करावे लागते आणि हीच चाचणी यशस्वी झाली आहे. चाचणी २ मे या दिवशी घेण्यात आली. हे इंजिन इस्रोच्या ‘एल्.व्ही.एम्. ३’ रॉकेटची पेलोड क्षमता (यंत्र अथवा मानव यांचे वजन वाहून नेण्याची क्षमता) वाढवण्यास साहाय्य करील. ‘एल्.व्ही.एम्. ३’ रॉकेटद्वारेच भारताने चंद्रयान-३ मोहीम प्रक्षेपित केली होती. ‘चंद्रयान-४’ मोहिमेतही हेच रॉकेट वापरले जाणार आहे.
‘क्रायोजेनिक इंजिन’ म्हणजे काय ?
एखाद्या रॉकेटच्या प्रक्षेपणाकरता जी ऊर्जा लागते, ती या यंत्राद्वारे पुरवली जाते. या तंत्रज्ञानामध्ये वापरण्यात येणारे इंधन हे अत्यंत अल्प तापमानामध्ये ठेवलेले असते. हे तापमान उणे १५० अंश सेल्सियसहूनही अल्प असते. भारतीय बनावटीच्या या यंत्राची पहिली यशस्वी चाचणी वर्ष २००३ मध्ये झाली; परंतु यशस्वी उड्डाणासाठी अनुमाने आणखी ११ वर्षे थांबावे लागले. भारतीय बनावटीची सध्या २ क्रायोजेनिक इंजिन आहेत – ‘सीई-७.५’ आणि ‘सीई-२०’! या यंत्रांमध्ये द्रवरूप ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचा इंधन म्हणून वापर केला जातो, तर सध्या विकसित केले जात असलेले अर्ध-क्रायोजेनिक इंजिनमध्ये द्रव हायड्रोजनऐवजी परिष्कृत केरोसीन वापरतात. द्रव ऑक्सिजनचा वापर ‘ऑक्सिडायझर’ म्हणून केला जातो.