पुणे येथे पथारी व्यावसायिकांकडे ५६ कोटी रुपयांची थकबाकी !

पुणे – शहरातील ९ सहस्र ८५२ पथारी (फेरीवाले) व्यावसायिकांची अंदाजे ५६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. ही थकबाकी भरावी अन्यथा परवाना रहित केला जाईल, अशी चेतावणी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली आहे. केंद्र सरकारने वर्ष २०१४ मध्ये फेरीवाला धोरण जाहीर केले होते, त्या अन्वये रस्त्यावर विविध प्रकारचे व्यवसाय करणार्‍या कष्टकर्‍यांना अधिकृतपणे व्यवसाय करण्याचा परवाना दिला गेला. अ, ब, क, ड, ई या श्रेणीनुसार त्यांना परवाने देण्यात आले. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात २३ सहस्र १६६ जणांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १२ सहस्र ११३ जणांचे शहरातील १५ क्षत्रिय कार्यालयांच्या हद्दीतील ५२५ झोनमध्ये पुनर्वसन केले; तर उर्वरित परवानाधारक कोठेच व्यवसाय करत नसल्याने त्यांचे परवाने रहित केले आहेत. कोरोना महामारीच्या काळात स्थायी समितीने पथारी व्यावसायिकांचे १२ कोटी रुपयांचे शुल्क माफ केले होते; मात्र त्यानंतरही अनेक व्यावसायिकांनी नियमित शुल्क भरणा करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ९ सहस्र ८५२ जणांनी ५६ कोटी १७ लाख ४२ सहस्र रुपयांचे शुल्क थकवल्याचे समोर आले आहे. (एवढे शुल्क थकवेपर्यंत महापालिकेचे अधिकारी काय करत होते ? – संपादक)