गुरुग्रंथसाहिब फाडल्याचा आरोप !
चंडीगड – पंजाबमधील फिरोजपूर येथील बाबा बीर सिंह गुरुद्वारामध्ये ठेवलेल्या गुरुग्रंथसाहिबची काही पाने फाडल्याचा आरोप करत बक्षीस सिंह नावाच्या १९ वर्षांच्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. जमावातील काही जणांनी आरोपी तरुणावर तलवारीने वार केले. गंभीररित्या घायाळ झालेल्या बक्षीस सिंह याला पोलिसांनी रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे वडील लखविंदर सिंह यांनी सांगितले, ‘माझा मुलगा मानसिक रुग्ण होता. बक्षीस सिंहच्या मारेकर्यांना कायद्याने शिक्षा व्हावी.’ या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
या प्रकरणी शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (एस्.जी.पी.सी.ने) निवेदन प्रसारित करून मृत तरुणाच्या कुटुंबावर सामाजिक आणि धार्मिक बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. ‘एस्.जी.पी.सी.’ने कोणत्याही गुरुद्वारामध्ये बक्षीस सिंह याचे अंत्यसंस्कार न करण्याचे आदेश जारी केले आहेत.