५ जणांना अटक, तर ५० लाख रुपयांचा माल जप्त !
जळगाव – शीतपेय बनवण्याच्या नावाखाली चालू असलेला बनावट देशी मद्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत ५० लाख रुपयांहून अधिकचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ५ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. ‘या निवडणुकीचा लाभ घेत औद्योगिक वसाहत भागात असलेल्या के-१० येथील एका आयुर्वेदिक उत्पादन या आस्थापनात शीतपेय बनवण्याच्या नावाखाली बनावट देशी मद्य बनवून त्याची बाजारात अनधिकृतपणे विक्री होत आहे’, अशी गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने औद्योगिक वसाहत पोलिसांच्या साहाय्याने ४ मेच्या मध्यरात्री या आयुर्वेद उत्पादन आस्थापनात धाड टाकली. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांना पाहून आस्थापनातील कर्मचार्यांनी आतून दार बंद करून घेतले होते; परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यांनी बंद असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश करत बनावट देशी मद्य बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या आस्थापनाच्या ठिकाणी भेट देऊन पहाणी केली, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या ठिकाणाहून बनावट देशी मद्य कोणत्या ठिकाणी गेले आहे, त्या ठिकाणांचीही चौकशी करून जिल्ह्यात वितरण करण्यात आलेला माल मागवण्यात यावा, अशाही सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.